मुंबई – बॉलीवूडचा अभिनेता सुनील शेट्टीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या स्टाईल आणि अभिनयाने त्याने बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. फिटनेसच्या बाबतीतही तो नेहमीच जागृत राहतो. आजही वयाची 60 वर्ष ओलंडल्यानंतरही तो फिट आहे. तरुण वर्गाला लाजवले असा त्याचा फिटनेस आहे. नुकतेच त्याने एका मुलाखतीमध्ये त्याच्या फिटनेसविषयी सांगितले आहे.
लिंकडेनवरुन त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याने फिटनेसबाबत सांगितले की, “मी रोज सकाळी 5 वाजता उठतो. त्यानंतर अंघोळ करून जिमला जातो. योगा आणि ब्रिदिंग एक्सरसाईज करतो. यावेळी मी मोबाईल पूर्णपणे दूर ठेवतो. कामावर जाण्याआधी स्वत:ला 4 ते 5 तासांचा वेळ देतो. यानंतर आई, पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालवतो. दिवसाची सुरवात लवकर केल्याने आपल्याला पुरेसा वेळ मिळतो आणि सर्व कामे वेळेत पूर्ण होतात.” गेली अनेक वर्ष हे रुटीन फॉलो करत असल्याचे त्याने सांगितले आहे.
योग्य आहार आणि योग्य प्रमाणात झोप हे सगळ्यात महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या कुटूंबासोबत वेळ घालवणे देखील गरजेचे आहे. याशिवाय आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोन पाहा, असा सल्लाही सुनील शेट्टीने दिला आहे. याआधी देखील त्याने त्याच्या फिटनेसबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वी सुनील शेट्टी, विवेक ऑबेरॉय आणि सोनाली कुलकर्णी यांची धारावी बँक नावाची एक मालिका प्रदर्शित झाली होती. त्यात सुनील शेट्टीनं साऊथच्या अण्णाची भूमिका केली होती. या भूमिकेसाठी त्याचे कौतुकही झाले होते. आता लवकरच तो ‘ऑपरेशन फ्रायडे’ आणि ‘हेरा फेरी’ या चित्रपटात दिसणार आहे.