नवी दिल्ली : जगाला धडकी भरणाऱ्या करोनाच्या नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनने आतापर्यंत 30 देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. नवीन व्हेरियंटमुळे करोनाची तिसरी लाट येणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आले आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग देण्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर काही मुद्यांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे.
ओमायक्रॉनवर सध्या उपलब्ध असलेल्या लसी कितपत प्रभावी आहेत, याबाबत अद्याप ठोस संशोधन समोर आले नाही. लसीकरणामुळे गंभीर आजारी होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो. त्यामुळे लसीकरण आवश्यक आहे. ओमायक्रॉनचा व्हेरियंट लसीच्या प्रभावाला कमी करत असल्याचे अद्याप ठोस पुरावे समोर आले नाहीत. मात्र, काही म्युटेशन लसीच्या प्रभावाला कमी करू शकतात असे म्हटले जाते.
ओमायक्रॉनचा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेशिवाय इतर देशांमध्येही आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हा व्हेरियंट मोठ्या प्रमाणावर फैलावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, बाधितांची संख्या किती असेल, आजाराची गंभीरता किती असेल, याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.
करोना चाचणीसाठी मोठ्या प्रमाणावर आरटी-पीसीआर चाचणी स्वीकारली गेली आहे. या चाचणीत विषाणूच्या विशेष जीनची ओळख पटवली जाते. ओमायक्रॉनच्या स्पाइक जीनमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. एका खास ‘एस जीन’सह अन्य जीनचा उपयोग करून संबंधित व्यक्ती बाधित आहे की नाही, याची माहिती समजू शकेल. मात्र, ओमायक्रॉनच्या बाधेबाबत अंतिम दुजोरा हा जीनोम सीक्वेंसिंगनंतर दिला जातो.
भारतातील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी 40 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी लशीच्या बूस्टर डोसची शिफारस केली आहे. इंडियन जीनोमिक्स सिक्वेन्सिंग कन्सोर्टियमने ही माहिती दिली आहे. हा गट जीनोम बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने तयार केलेले नेटवर्क आहे. गटाने म्हटले की, संसर्गाचा अधिक धोका असलेल्या व्यक्तींसाठी बूस्टर डोसचा विचार केला जाऊ शकतो. यामुळे गंभीर आजाराचा धोका कमी होण्याची शक्यता आहे.