मुंबई –महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणूक निकालांमुळे सगळेच चकित झाले. भाजपच्या सरकारांवर जर जनता नाराज असेल; तर तो पक्ष त्या राज्यांत निवडणुका जिंकतोच कसा? हरियाणातील जनता भाजप सरकारवर खुष असेल; तर तेथील शेतकरी आंदोलन का करत आहेत, असे सवाल कॉंग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी शनिवारी विचारले.
पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी रॉबर्ट वाड्रा यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली. विरोधकांकडून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (इव्हीएम) विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसाच सूर आळवत वाड्रा यांनी इव्हीएमविषयी साशंकता व्यक्त केली. सध्या जनता महागाईने त्रस्त आहे.
शेतकरी आंदोलन करत आहेत. तसे असूनही राजकारणाचा फोकस मशिदींच्या सर्वेक्षणावर आहे. ती बाब अतिशय चुकीची आहे. तशाने विकासाऐवजी जातीय मुद्दे पुढे येतील. त्यातून नाहक अशांत स्थिती निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला. भारत हा विविधता असणारा देश आहे. त्यामुळे आपण धर्मनिरपेक्ष असायला हवे. धर्माचे राजकारण केले जाऊ नये. धर्म आणि राजकारण वेगळे असायला हवे, असे परखड भाष्य त्यांनी केले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पत्नी प्रियंका यांच्याविषयीही वाड्रा यांनी मनमोकळी भूमिका मांडली. अदानी प्रकरणी राहुल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तरे देण्याऐवजी त्यांच्यावर निराधार आरोप केले जात आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. प्रियंका प्रतिनिधित्व करत असल्याने वायनाड सुपर मतदारसंघ बनेल. त्या देशाशी निगडीत मुद्दे उपस्थित करतील. त्या महिलांसाठी मजबूत आवाज बनतील.
प्रियंका यांनी त्यांचा कौटूंबिक वारसा पुढे न्यावा. तसेच, स्वत:ची ओळख निर्माण करावी. भाजपच्या नजरेला नजर भिडवून त्या प्रश्न विचारतील. त्यांच्या क्षमतेवर आणि व्हिजनवर माझा विश्वास आहे. राहुल आणि प्रियंका यांच्या संसदेतील उपस्थितीमुळे जनतेचा आवाज मजबूत होईल. त्यामुळे कॉंग्रेसला चांगले भविष्य असल्याचे मला वाटते, असे वाड्रा यांनी म्हटले.