फंडातून बाहेर पडण्याचा निर्णय कसा घ्यायचा?

तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर यावर्षी नक्कीच तुम्हांला बाजारातील चढ-उताराचा अनुभव आलेला असेल. निश्चितच हे वर्ष अनिश्चिततचे आणि अस्थिरतेचे ठरले आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरु करणाऱ्या अनेकांना असे वाटले होते की, आता आपला पैसा चांगल्या प्रकारे वाढणार त्यांना काही प्रमाणात चटके बसले आहेत. काही जणांना हे दुःस्वप्न वाटू लागले आहे तर काही जणांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

मात्र अशा परिस्थितीत गुंतवणुकीतून बाहेर पडण्यापूर्वी सगळ्या बाजूंनी विश्लेषण करून मग निर्णय घ्या. सर्वोत्कृष्ठ फंड शोधून काढण्यासाठी मोठी मेहनत घेतलेली असते आणि बाहेर पडण्याचा निर्णय मात्र झटक्‍यात घेतला जातो. मग म्युच्युअल फंडातून बाहेर पडण्याचा निर्णय कसा घ्यायचा?

प्रश्न – तुम्ही गुंतवणुकीत विविधता कशा प्रकारे ठेवली आहे?

तुमच्या गुंतवणुकीतील इक्विटीमधील गुंतवणूक किती आहे हे तपासा. संपत्ती निर्माण करण्यातील महत्त्वाचा नियम म्हणजे गुंतवणुकीतील शिस्तबद्ध विविधता. जर तुम्ही ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक इक्विटी फंडात झाली असेल तरच बाहेर पडण्याचा विचार करा. परंतु इक्विटीतील गुंतवणूक आधीच खूप कमी असेल तर बाहेर पडणे हुशारीचे ठरणारे नसते.
मग प्रश्न असा निर्माण होतो की, इक्विटी फंडात किती गुंतवणूक असावी?

यासाठी नेमका आकडा किंवा टक्केवारी सांगता येणार नाही. प्रत्येकाच्या जोखिम पचवण्याच्या क्षमतेवर ते अवलंबून असते. आर्थिक नियोजनकार म्हणतात की, शेअरबाजारात मोठी हालचाल झाल्यानंतर किंवा वर्षातून एकदा आपल्या पोर्टफोलोचे संतुलन तपासून घ्यावे. आवश्‍यकता वाटल्यास पुनर्संतुलन साधावे. तुम्ही हे स्वतः करू शकत नसाल तर डायनॅमिक फंडाची निवड करा.

प्रश्न – तुम्हांला पैशांची गरज केव्हा भासणार आहे?

तुमचे उद्दिष्ट आणि त्यासाठी असणारा कालावधी लक्षात घेऊन गुंतवणुकीत विविधता ठेवावी. जर उद्दिष्ट पाच ते सात वर्षे लांब असेल तर इक्विटी फंडाकडे झुकण्यास हरकत नाही. मात्र त्या फंडाची संपत्ती निर्माण करण्याची क्षमता तपासून घेतली पाहिजे. मग मध्येच करेक्‍शन आली म्हणून तुम्हांला काळजी वाटणार नाही. अशा चढ-उताराच्या चक्रातून व्यवस्थितपणे पुढे जाण्यासाठी एसाआयपीचा मार्ग योग्य ठरतो.

प्रश्न – तुमचे उद्दिष्ट खूप जवळ म्हणजे 2-3 वर्षाचे असेल तर?

अशा स्थितीत इक्विटी फंडातील गुंतवणूक जोखमीची ठरू शकते. जर दोन वर्षात फारशी संपत्ती निर्मिती झाली नाही आणि तुम्ही पैसे काढण्याच्या वेळीच बाजारात घसरण झाली तर तुमच्या हातात अपेक्षित रक्कम पडणार नाही. हे टाळण्यासाठी गुंतवणूकदाराने उद्दीष्ट जवळ येईल तसतशी इक्विटी फंडातील गुंतवणूक कमी करत जावे.

 

प्रश्न – तुमच्या फंडाची कामगिरी कशी आहे?
फंडाची कामगिरी निराशाजनक असेल तर त्यातून बाहेर पडण्याचे ते एक कारण ठरू शकते. पण जेव्हा सगळ्याच बाजारात (सर्व क्षेत्रात) घसरण झालेली असते तेव्हा कुठलाही फंड त्या घसरणीतून सुटत नाही. त्यामुळे तुमच्या फंडच्या वर्गातील अन्य फंडांची कामगिरी कशी आहे याचा अभ्यास करा. ही तुलना तात्कालिक नसावी. तुलना ही किमान 2 ते 3 वर्षातील कामगिरीची असावी. जेणेकरून बाजारातील चढउताराच्या चक्राचा त्यात समावेश असेल.

बेंचमार्क इंडेक्‍स किंवा बरोबरीच्या फंडांच्या तुलनेत गेल्या काही वर्षात तुमचा फंड कामगिरीबाबत मागे पडलेला असेल तर बाहेर पडून नव्या फंडात गुंतवणूक करण्याचा विचार होऊ शकतो. जर थोडा अधिक काळ फंड कामगिरीबाबत मागे पडला असला तरी बाहेर पडण्याचा विचार करणे योग्य ठरत नाही.

प्रश्न – तुमचे उद्दिष्ट बदलले आहे का?

परिस्थितीत मोठे बदल घडून आले तर उद्दीष्टाचा कालावधी किंवा उद्दीष्टातील अपेक्षित परतावा बदलू शकतो. एखाद्याने 7-8 वर्षांनंतर मोठे घर खरेदी करण्याचे नियोजन केले असेल आणि काही दिवसात अपत्य झाले किंवा वयोवृद्ध आईवडिल राहण्यासाठी आले तर तातडीने मोठ्या घराची गरज भासू शकते.

अशावेळी गुंतवणुकीची व्यूहरचना बदलावी लागते आणि गुंतवणुकीच्या विविधततेही मोठे बदल होऊ शकतात. आता उद्दिष्ट अगदी काही महिन्यांवर असल्याने तुम्हांला इक्विटी फंडातून बाहेर पडावे लागणार असते. जर तुम्ही दोन-तीन वर्षातच घर खरेदी करायचे ठरवले असेल तर डेट फंड हा सगळ्यात चांगला पर्याय ठरतो.

प्रश्न – अनेक फंडात तुमची गुंतवणूक आहे का?

फंडातून बाहेर पडण्याचे आणखी एक कारण म्हणजे आपली अनेक योजनांमध्ये गुंतवणूक असणे. तुम्ही तुमच्या खात्यात अनेक योजना समाविष्ट करत राहिलात तर अनेक वेळा द्विरुक्ती होण्याची शक्‍यता असते. जास्तीत जास्त पाच ते सहा योजनांमध्ये गुंतवणूक करावी. त्यापेक्षा जास्त योजनांमध्ये गुंतवणूक फारशी प्रभावी ठरत नाही. पुन्हा जितक्‍या जास्त योजना तितकी त्यांच्यावर देखरेख ठेवणे कठीण होते.

– चतुर

Leave A Reply

Your email address will not be published.