हिरोशिमा, नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बला नावे कशी मिळाली ?

अणूबॉम्बच्या हल्ल्याला झाली 75 वर्षे पूर्ण

वॉशिंग्टन: दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकीवर अणूबॉम्ब टाकला. त्या घटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. पहिला अणूबॉम्ब हिरोशिमा शहरावर 6 ऑगस्ट 1945 ला टाकला गेला होता. त्यानंतर तीनच दिवसांनी 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकीवर दुसरा अणूबॉम्ब टाकला गेला होता.

या अणूबॉम्बच्या स्फोटामुळे लाखो नागरिक ठार झाले आणि किरणोत्सर्गामुळे पुढील पिढ्याही विकलांग झाल्या. हिरोशिमावर टाकल्या गेलेल्या अणूबॉम्बला “लिटील बॉय’ आणि नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बचे नाव “फॅट मॅन’ असे दिले गेलेले होते. ही नावे एखाद्या निरपराध, निरागस व्यक्‍तींप्रमाणे भासतात मात्र त्या बॉम्बने केलेला विद्‌ध्वंस मानवतेला काळीमा फासणारा होता.

आज जगभरात भारतासह डझनभर देशांकडे अणूबॉम्ब आहेत. मात्र दुसऱ्या महायुद्धात झालेल्या प्रचंड नरसंहारानंतर इतर कोणत्याही देशाने अन्य कोणत्याही शत्रू देशावर अणूबॉम्ब टाकलेला नाही.

अगदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन आणि अन्य कोणत्याही देशाच्या अध्यक्षांनी आपल्या प्रतिस्पर्धी देशांना अणू युद्धाची धमकी जरी दिली असली तरी ही धमकी प्रत्यक्षात आणली गेलेली नाही.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास अमेरिकेने दोन अणूबॉम्बच्या निर्मितीसाठी तब्बल 2 अब्ज डॉलर खर्च केले होते. अमेरिकेने फार मोठा वैज्ञानिक जुगार खेळला असून अमेरिका या जुगारामध्ये विजयी झाली आहे, असे अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष ट्रुमन यांनी म्हटले होते.

भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट सर्बर यांनी या दोन्ही बॉम्बच्या आकारांवरून त्यांचे नामकरण केले होते. हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बला पूर्वी “थिन मॅन’ असे म्हटले गेले होते. डॅशिल हॅमेट यांनी लिहीलेल्या रहस्यकथेतील हे एक पात्र होते. या बॉम्बमध्येच सुधारणा करून “लिटील बॉय’ची निर्मिती केली गेली होती. “लिटील बॉय’मध्ये युरेनियम आणि “थिन मॅन’मध्ये प्ल्युटोनियमचा वापर केला गेला होता.

“फॅट मॅन’हे देखील हॅमेट यांच्या 1930 च्या “माल्टीज फाल्कन’रहस्य कादंबरीतील एक पात्र होते. त्याच कादंबरीवर 1941 सली आलेल्या सिनेमामध्ये हे पात्र साकारणाऱ्या सिडने ग्रीनस्ट्रीट सारखाच गोल गरगरीत दिसत असल्यामुळे “थिन मॅन’चे नाव बदलून नंतर “फॅट मॅन’ केले गेले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.