अंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी बनली?

नवी दिल्ली: भारतीय द्वीपकल्पापासून दूर हिंदी महासागरात असलेली अंदमान-निकोबार बेटे भारताचा भाग कशी ठरवण्यात आली, याचा इतिहास रंजक आहे. अकराव्या शतकामध्ये चोल राजघराण्यातील पराक्रमी राजा राजेंद्र चोल ह्यांनी ह्या बेटांचा ताबा घेतल्याचे काही संदर्भ आहेत. त्यांनी ह्या बेटांचा वापर हा सुमात्रा (इंडोनेशिया) च्या श्रीविजय साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी सैनिक तळ स्थापन करण्यासाठी केला होता, असे इतिहास सांगतो.

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाचा इतिहास बघता असे लक्षात येते कि मराठी नौदलाधिकारी कान्होजी आंग्रे हे ह्या बेटांचा युद्धात वापर करणारे पहिले अधिकारी होते. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी इथे आपला सैनिक तळ वसविला होता.

त्या वेळेला अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या बाजूचा जो समुद्र आहे त्याचा वापर पोर्तुगीज, इंग्रज आणि डच नौदल किंवा व्यापारी जहाजे जवळच लागून असलेल्या त्यांच्या वसाहतींना भेट देण्यासाठी किंवा परतीच्या मार्गावर करत असत. ह्या जहाजांवर अंकुश ठेवण्यासाठी किंवा गरज पडल्यास आक्रमण करण्यासाठी कान्होजी आंग्रे ह्यांनी ह्या बेटाचा खुबीने वापर केलेला आढळून येतो. ब्रिटिश आणि पोर्तुगीज नौदलाने वारंवार प्रयत्न करूनही ते पराक्रमी कान्होजी आंग्रे ह्यांना कधीच पराभूत करू शकले नाहीत.

त्यानंतर खूप वर्षांनी म्हणजेच वर्ष 1789 मध्ये ब्रिटिशांनी इथे त्यांची वसाहत स्थापन केली पण ती फक्त काही काळच टिकली. एका गूढ आजारामुळे तिथे लोकांचा मृत्यू होऊ लागल्यामुळे त्यांना वसाहत खाली करावी लागली. तर वर्ष 1857 च्या राष्ट्रीय उठावानंतर ब्रिटिशांनी इथे सेल्युलर जेलची स्थापना केली आणि इथे स्वातंत्र्यसैनिकांना शिक्षा म्हणून पाठवायला सुरुवात केली.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह हा काही काळ जपानच्या ताब्यात होता. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांचे जपानशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे जपानने ही बेटे त्यांच्या ताब्यात दिल्याचे आढळून येते. पण तदनंतर एक दोन वर्षात ब्रिटिशांनी ह्या बेटांचा पुन्हा ताबा मिळविला. वर्ष 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही बेटे भारतामध्ये विलीन करण्यात आली. 1 नोव्हेंबर 1956 मध्ये ह्या बेटांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)