मुंबई : राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा लढविण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. एका जागेवर संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर दुसऱ्या जागेसाठी चाचपणी सुरु असतानाच संभाजीराजेंनी शिवसेनेसहीत सर्वच राजकीय पक्षांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. अशातच अपक्ष म्हणून संभाजीराजेंना मतदान करणार की शिवसेनेला या प्रश्नावर पवारांनी उत्तर देताना, “संभाजीराजे असोत की, आणखी कुणी, मतं शिवसेनेच्याच उमेदवाराला,” असे वक्तव्य केले. याच वक्तव्यावरुन निलेश राणेंनी पवारांवर टीका केली आहे.
शरद पवारांवर निशाणा साधताना पवार कधी शब्द पाळत नाही असा टोला नितेश यांनी लागवलाय. “हे होणारच होतं… पवार साहेब आणि शब्द पाळला होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले?? राजे जर शिवसेनेसोबत जाणार तर संजय (राऊत) दुसऱ्या सीटवर आहे ज्यांनी मराठा मुक मोर्चाची मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली होती, विसरू नका,” असे ट्विट नितेश राणेंनी केले.
शरद पवार यांनी यापूर्वी संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासंदर्भात राष्ट्रवादी अनुकूल असल्याचं सांगितल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी हे वक्तव्य केले आहे.
राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घातली असली तरी शिवसेनेत प्रवेश करण्याची संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.