लखनौ – उत्तर प्रदेशात घडलेल्या पोलीस हत्याकांडातील प्रमुख आरोपी विकास दुबेला आज मध्य प्रदेशातील उज्जैन येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुबे हा उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिरामध्ये पूजेसाठी आला असल्याचे येथील सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. यानंतर दुबे पूजे-अर्चेसाठीचे साहित्य घेऊन मागील बाजूच्या दरवाज्याने मंदिरात जात असतानाच पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
दुबे व त्याच्या साथीदारांनी बेछूट गोळीबार करत धाड टाकण्यासाठी आलेल्या आठ पोलिसांना जागीच ठार केले होते. तर अन्य सात पोलीस कर्मचारी या हल्ल्यात जखमी झाले आहेत. थेट पोलिसांवरच जीवघेणा हल्ला झाल्याने उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून हल्ल्याचा सूत्रधार विकास दुबे पोलिसांच्या हाती लागला असला तरी देखील हे प्रश्नचिन्ह कायम आहे.
आठ पोलिसांचा निर्घृण खून करून विकास दुबे हा आरोपी ७०० किलोमीटर दूर असलेल्या उज्जैन येथे पोहचतोच कसा? असा प्रश्न काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे. याबाबत ट्विटद्वारे त्या म्हणतात, “विकास दुबेचा ७०० किलोमीटर प्रवास हा उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षेबाबत केलेले दावे फोल असल्याचे सिद्ध करणारा आहे. सरकारच्या सुस्त कारभाराचा पर्दाफाश झाला आहे.”
दरम्यान, याबाबत उत्तर प्रदेशचे माजी मुयख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील प्रश्न उपस्थित केले असून “कानपूर प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिस कोठडीत असल्याची बातमी आहे. जर हे सत्य असेल तर, सरकारने ही शरणागती आहे की अटक याबाबत स्पष्टीकरण द्यावे. त्याचे सर्व कॉल रेकॉर्ड सार्वजनिक केले जावे जेणेकरून जे-जे लोक त्याच्याबरोबर हितसंबंध जोपासून होते त्यांना उघडकीस आणता येईल.” अशी मागणी केली आहे.
उत्तर प्रदेशातील आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी दुबे याला अटक करण्यात युपी पोलिसांना अपयश आल्याचं म्हंटल आहे. याबाबत ट्विट करताना ते लिहतात, “विकास दुबेला आम्ही अटक करू शकलो नाही आणि त्याने उज्जैनमध्ये आत्मसमर्पण केले. एवढ्या मोठ्या घटनेनंतरही आम्ही त्याला अटक करू शकलो नाही आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहिला. याची चौकशी झाली पाहिजे”
ठाकूर यांनी केलेल्या दाव्याच्या विरोधी दावा मध्य प्रदेशाचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केला आहे. ते म्हणतात, “बिट्टू आणि सुरेश असे दोन साथीदार असलेल्या कारमध्ये तो राजस्थानच्या कोटामार्गे मध्य प्रदेशात दाखल झाला. त्याने ‘पॉल’ नावाचा बनावट आयडी वापरला. त्याला अटक झाली असून त्याने आत्मसमर्पण केलेले नाही.”