मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुमारे सव्वा चार कोटी रूपयांची जी मालमत्ता जप्त केली आहे ती सन 2004 आणि 2005 सालातील आहे. जर ईडीने इतक्या जुन्या व्यवहारातील मालमत्ता जप्त केली असेल तर त्याचा सचिन वाझे प्रकरणाशी संबंध कसा? असा सवाल कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
या मालमत्तांचा सचिन वाझे प्रकरणाशी संबंध नाही असा खुलासा ईडीने का केला नाही असा प्रश्नही सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
ट्विटर संदेशात सावंत यांनी म्हटले आहे की,अनिल देशमुख यांच्या उरण येथील एका जागेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. ही जमीन अनिल देशमुख यांच्याशीा संबंधीत कंपनीने 2005 मध्ये खरेदी केली आहे आणि त्याची किंमत 2 कोटी 69 लाख रूपये असल्याचे ईडीनेच म्हटले आहे.
पण प्रसार माध्यमांमध्ये मात्र ही जमीन तीनशे कोटी रूपये किंमतीची असल्याचे म्हटले होते. त्यावेळी ईडीने याचा खुलासा का केला नाही असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे. दुसरा जो एक फ्लॅट ईडीने जप्त केला आहे तो खरेदी व्यवहार 2004 साली झाला आहे असे असताना याचा सचिन वाझे प्रकरणाशी संबंध कसा याचाही खुलासा ईडीने करायला हवा होता असेहीं सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
सचिन वाझे याने बार मालकांकडून 4 कोटी 70 लाख रूपये जमा करून अनिल देशमुखांना दिले असेहीं सांगितले गेले आहे, हे जर खरे असेल तर संबंधीत बार मालकांवर ईडीकडून अजून कशी कारवाई केली गेली नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. ईडीच्या या सगळ्या कारवाया मोदी सरकारच्या इशाऱ्याने आणि केवळ महाआघाडी सरकारला बदनाम करण्याच्या इराद्यानेच केल्या जात आहेत असा आरोपही सावंत यांनी केला आहे.