पिरंगुट -कसं बोलू आणि काय सांगू… डोळ्यासमोर खाख झाली… असे बोलत बबन मरगळे यांचा आक्रोश दगडालाही पाझर फोडणारा होता. उरडवडे येथील कंपनीत काम करणाऱ्या मरगळे दाम्पत्याची या दुर्घटनेमुळे ताटातूट झाली आहे.
ज्या कंपनीत काम करून सुखी संसारासाठी पैसे कमावत होते, त्याच कंपनीत घराची कारभारणी आगीत जळून खाक झाल्यामुळे बबन मरगळे यांना मोठा धक्का बसला आहे.
या कंपनीला लागलेल्या आगीत बबन यांच्या पत्नी मंगल यांचा मृत्यू झाला. हे दोघेही याच कंपनीत कामाला होते.
आग लागली तेव्हा बबन हे दुसऱ्या खोलीत होते ते आणि 5 ते 6 पुरुष कामगार व एक महिला कामगार जीव वाचवून बाहेर पडले; मात्र मंगल आणि त्यांच्या सहकारी हे होरपळून मरण पावले. बबन यांनी पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला.
मात्र दरवाजे घट्ट झाल्याने पत्नीला आणि इतर महिलांना बाहेर पडता आले नाही. डोळ्यात देखत आपल्या पत्नीला आगीच्या खाईत मरताना पहावे लागले. कामगारांचा आक्रोश आणि मदतीसाठी याचना मन हेलावून टाकणारी होती.