“मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हे मी कसं ठरवणार? त्यांच्या मनात काय हे मी कस सांगू?”

'भावी सहकारी' वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी ‘भावी सहकारी’ म्हणत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.  त्यासोबतच राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्या आहेत.  त्यातच मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले, ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावं हे मी कसं ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हे मी कस सांगू?

माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, काय कसं चालवायचं, समस्या काय याच्याच चर्चा होतात. आज पूर्णपणे बहुमत महविकास आघाडीकडे आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे.

आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका करत आहोत. …म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनातली भावना बोलून दाखवली हे जे काही अनैसर्गिक गठबंधन बनलं आहे ते फारकाळ चालू शकत नाही. मला असे वाटतं कदाचित मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आलं असेल की अशा प्रकारचं अनैसर्गिक गठबंधन करुन महाराष्ट्राचं नुकसान होत आहे आणि म्हणून त्यांनी मनातली भावना बोलून दाखवली असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद येथील कार्यक्रमात मंचावर भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी म्हटलं, “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी” असे म्हटले.

मुख्यमंत्र्यांनी हे विधान रावसाहेब दानवे यांच्या समोर तसेच त्यांच्याकडे पाहून केल्याने विविध चर्चा रंगत आहेत. जाहीर व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या विधानाने आता शिवसेना-भाजपची पुन्हा युती होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले हे सूचक वक्तव्य आहे का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.