हॉलमधील फर्निचर, पडद्याची रंगसंगती यांच्याबरोबरच आणखी एक गोष्ट हॉलची शोभा वाढवत असते, ती म्हणजे घराचे प्रवेशद्वार! सुरक्षिततेबरोबरच घराला एक आकार देणारा असतो घराचा दरवाजा. घरात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करणारा हा दरवाजाही घराच्या सजावटीत महत्त्वाची भूमिका बजावतो. आकर्षक कलाकुसर केलेले दरवाजे बसवून घेण्याचा आता ट्रेंडच आला.
मिस्टर अँड मिसेसच्या नेमप्लेटसह वेलकम होमसारख्या विविध पाट्या दिमाखात मिरवणारा, रंगीत तोरणांनी सजलेला दरवाजा उपयुक्ततेबरोबरच घराच्या सजावटीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरतो.
आधुनिक फ्लॅट संस्कृतीत लाकडाच्या किंवा धातूच्या दरवाजांसह अनेकविध प्रकार आता उपलब्ध आहेत. घराचा सुटसुटीतपणा, व्हेंटिलेशन असो किंवा भरपूर सूर्यप्रकाश येणारी खोली असो, दरवाजामुळे घराचा संपूर्ण लुक बदलतो.
दरवाजाचे रंगरूप घराचा आकार आणि पद्धतीवरही अवलंबून असते. त्यामुळे दरवाजा उठावदार करून, खोलीला सौंदर्य मिळवून देणारी अनेक प्रकारची डिझाईन्स वापरून कलात्मक दरवाजा बनविले जातात. त्याप्रमाणेच दरवाजाची कडी, पिनहोल, हॅंडल यांना बाधा येणार नाही. याचीही खबरदारी घ्यावी लागते.
दरवाजाला लागणारी ही सर्व साधने आता खूप प्रकारात मिळतात. सर्वात महत्त्वाचा आणि सर्वाधिक वेळा वापर केला जाणारा दरवाजा म्हणजे घराचे मुख्य प्रवेशद्वार. दरवाजाचे डिझाईन करताना घराचे आवार, बांधलेल्या घराची जागा यांचाही विचार करणे आवश्यक ठरते. घराची अंतर्गत सजावट आणि घराचे आवार यांच्या रचनेनुसार मुख्य दरवाजाची सजावट करता येते.
– कीर्ती कदम