नवी दिल्ली: भारत आणि चीन दरम्यान प्रत्यक्ष ताबा रेषेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लडाखच्या पूर्वेकडील भागात चिनी सैन्याच्या हालचालींवर भारतीय लष्कराकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. चीनच्या सीमेपासून 100-150 किलोमीटर अंतरावरील होर्तान आणि गार्गुन्सा या तळांवरील लढाऊ विमाने सीमाभागात घिरट्या घालत असल्याचे आढळून आले आहे.
चीनकडून जे-11 आणि जे -7 या श्रेणीच्या 10-12 लढाऊ विमानांची तुकडी या तळांवर सज्ज ठेवण्यात आली आहे. ही विमाने भारतीय हद्दीजवळून अगदी जमिनीच्या जवळून घिरट्या घालत आहेत. या विमानांच्या हालचालींवर भारतीय लष्कराच्यावतीने बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, असे लष्कराच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
होर्तान आणि गार्गुन्सा या तळांवरून चिनी विमानांच्या हालचालींना अगदी अलिकडेच गती मिळाली आहे. ही विमाने लडाखमध्ये भारतीय हद्दीपासून 30 ते 35 किलोमीटरपर्यंत येत आहेत. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार सीमेपासून 10 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहेत, असेही या सूत्रांनी सांगितले.
मे महिन्याच्या सुरुवातीला भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर आणि चीनचे हेलिकॉप्टर आमने सामने आले होते. त्यावेळी भारताची सुखोई-30 एमकेआय विमानेही पुढे सरसावली होती. होर्तान हवाई तळावर चीन आणि पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी अलीकडेच संयुक्त सराव केला होता. तेंव्हापासून या तळावरील हालचालींवर भारताकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. गेल्यावर्षीही लडाखच्या पश्चिमेकडील बाजूस पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकची 6 जेएफ -17 लढाऊ विमाने स्कार्दू कडून होर्तानकडे जाताना आढळली होती. ही विमाने “शाहीन-8′ या हवाई सरावासाठी गेली होती.
भारताकडूनही सीमाभागात “अनमॅन्ड एरियल व्हेईकल्स’च्या माध्यमातून “एलएसी’, चीनच्या हद्दीत आणि गालवान नाला परिसरातही देखरेख केली जात आहे, असे या सूत्रांनी सांगितले.