आकर्षक पणत्या खरेदीसाठी गृहिणींची लगबग

पुणे – पणत्या हा दिवाळीचा अविभाज्य घटक आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या यादीमध्ये देखील आवर्जुन पणत्यांचा समावेश केला जातो. आकर्षक आणि सुबक पणत्यांच्या खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग सुरू होते. यंदादेखील विविध आकाराच्या आणि रंगेबेरंगी पणत्या बाजारात दाखल झाल्या आहेत.

यंदा गोल, चौकोनी, पंचकोनी पणत्यांसह आकर्षक रंग, कुंदनचे खडे आणि आरसे असणाऱ्या पणत्याबाजारामध्ये दाखल झाल्या आहेत. शहरांतील बाजारपेठांसह “ऑनलाइन’ बाजारपेठांमध्ये विविध आकाराच्या आणि रंगांच्या पणत्या उपलब्ध आहेत. कारागिरांनीदेखील यंदा पणत्यांच्या “डीझाइन’मध्ये बदल केला आहे. यावर्षी पाना-फुलांचे नक्षीकाम असणाऱ्या पणत्यांना विशेष मागणी आहे. पणत्यांसह मातीचे लामण दिवे, दीपमाळांना देखील अधिक मागणी आहे. मातीच्या एक डझन पणत्या पारंपरिक आणि “ऑनलाइन’ बाजारपेठेत साधारण 70 ते 250 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यासह नागरिकांकडून रंगकाम न केलेल्या पणत्यांची देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

पारंपरिक मातीच्या पणत्यांच्या बरोबरीने यंदा “एलईडी’, “रिप्लेक्‍टेड’ पणत्यांसह प्लॅस्टीकच्या “फ्लोटींग’ पणत्या, मेणाच्या पणत्या, डेकोरेटेड पणत्यांचे पर्याय सध्या बाजारामध्ये “ट्रेन्डींग’ आहेत. या पणत्यांच्या किंमती साधारण 100 रुपयांपासून पुढे आहेत.

कुंभारवाड्यांतील कारागिरांना पावसाचा फटका

सतत बरसणाऱ्या पावसाचा फटका यंदा कुंभारवाड्यांतील कारागिरांना बसला आहे. नवरात्रानंतर पणत्या करण्याची लगबग कुंभारवाड्यामध्ये सुरू असते. मात्र, यावर्षीच्या ढगाळ हवामान आणि पावसाने पणत्या आणि बोळकी तयार करताना आणि सुकवताना अडचणी आल्या. या वातावरणामुळे पणत्या बाजारात येण्यास उशीर झाल्याचे कारगिरांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.