घरांच्या विक्रीत 58 टक्‍क्‍यांनी वाढ

ऍनारॉक; सरकारने दिलेल्या सवलतीचा सकारात्मक परिणाम

पुण्यात घरांच्या विक्रीत झाली तब्बल 80 टक्‍के वाढ

नवी दिल्ली – जानेवारी ते मार्च या सरलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत देशातील सात मोठ्या शहरात घरांच्या विक्रीत तब्बल 58 टक्‍के वाढ झाली आहे. या तिमाहीत 78,520 इतकी घरे विकली गेली असल्याचे मालमत्ता क्षेत्रातील कन्सल्टंट ऍनारॉक या संस्थेने म्हटले आहे.

गेल्या काही दिवसात केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने घरबांधणी क्षेत्राला चालना देण्यासाठी बऱ्याच सवलती दिल्या असल्यामुळे घर विक्री वाढण्यास मदत झाली आहे असे या संस्थेचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या शहरात पाहणी करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

पुरी म्हणाले की, बॅंका कर्ज घेण्यास कठोर नियम लावत आहेत. त्याच बरोबर एनबीएफसी या क्षेत्रातही अनुत्पादक मालमत्तेचा प्रश्‍न निर्माण झाल्यामुळे घरांच्या विक्रीवर परिणाम होईल असे आम्हाला वाटले होते. मात्र प्रत्यक्षात घरांची विक्री वाढत आहे त्याचबरोबर घरांचा पुरवठा ही वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्या क्षेत्रात सध्या आशावाद निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत. यामुळे आगामी काळात या क्षेत्राला चांगले दिवस येण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

अंतरिम अर्थसंकल्प घरबांधणी क्षेत्राला बऱ्याच सवलती दिल्या आहेत. जीएसटी दरात घट करण्यात आली आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात कपात केल्यामुळे काही बॅंकांनी घरासाठीच्या व्याज दरात काही प्रमाणात कपात केली आहे. आनंदाची बाब म्हणजे चार एप्रिल रोजी पुन्हा रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात कपात केली आहे. त्याचबरोबर अंतरिम अर्थसंकल्पात इतर अनेक सवलती दिलेल्या आहेत. अगोदर फक्त एका घरासाठी असलेल्या सवलती आता काही प्रमाणात दुसऱ्या घरासाठी ही देण्यात आलेल्या आहेत.

मुंबईमध्ये या तिमाहीत विक्रीत 95 टक्के वाढ होऊन ती 24010 युनिट्‌स इतकी झाली आहे. पुण्यामध्ये या तिमाहीत घरांच्या विक्रीत 80 टक्‍क्‍यांची वाढ झाली. या तिमाहीत पुण्यात 12 340 इतकी घरे विकली गेली आहेत. हैदराबादमध्ये घरांच्या विक्री ते 30 टक्‍क्‍यांनी, कोलकाता येथे घरांच्या विक्रीत 18 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. नोटाबंदी, रेरा आणि जीएसटी या घटनांचे परिणाम आता संपुष्टात आले आहेत. दीर्घ पल्ल्याच्या या क्षेत्रासाठी एक स्थिर स्वरूपाची नियमावली तयार झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.