दगडखाणीतील सुरुंगामुळे घर, शाळेला तडे

महसूलकडे पाठपुरावा करूनही तर्डोबावाडीकर बेदखल : आंदोलन छेडण्याचा इशारा

शिरूर – तर्डोबावाडी (ता. शिरूर) येथील थापेमळा, गोऱ्हेमळा, जांभळी मळा येथे सुरू असलेल्या दगडखाणीसाठी सुरुंग, स्फोटकांचा वापर होत असल्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. घरे, शाळेच्या भिंतीना तडे गेले आहेत. त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. दगडखाणी कायमस्वरूपी बंद कराव्यात, यासाठी नागरिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, ग्रामस्थांनी शिरूरचे तहसीलदार गुरू बिराजदार यांना निवेदन दिले आहे. या दगडखाणी बंद करा; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

यावेळी तर्डोबावाडी उपसरपंच तज्ञिका कर्डिले, माजी उपसरपंच संभाजी कर्डिले, बबनराव कर्डिले, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हरिदास कर्डिले, लक्ष्मण कर्डिले, ग्रामपंचायत सदस्य गणेश खोले, रावसाहेब कर्डिले, एकनाथ कर्डिले, महेश कर्डिले, महेंद्र पाचर्णे, दिनेश कर्डिले, प्रवीण कर्डिले, वैभव कर्डिले, अनिकेत कर्डिले, संतोष कर्डिले, रवींद्र खरबस, सचिन कर्डिले, नितीन कर्डिले, संजय कर्डिले, लक्ष्मण शिंदे, कांतीलाल कर्डिले. निखिल कर्डिले, शिवाजी खरबस, सचिन गोऱ्हे, रमेश गोऱ्हे, रुपेश गोऱ्हे, राजेंद्र डोळझाके, सतीश कर्डिले उपस्थित होते.

थापेमळा, जांभळीमाळा, गोऱ्हे मळा आदी वस्त्यांना लागूनच श्रीराम स्टोन क्रेशर कंपनी, शेखर स्टोन क्रेशर कंपनी, जयाजवान स्टोन क्रशर आहेत. दगडखाणीत स्टोन क्रशर सुरू आहेत. लोकवस्तीजवळच खाणी आहेत. सुरूंग लावून खाणकाम सुरू आहे. यासाठी उपाययोजना नसल्याने सुरुंग स्फोटानंतर उडणारे दगड हे लोकवस्तीत पडत आहेत. त्यामुळे अनेकवेळा जनावरे, नागरिकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. खाणकामामुळे परिसरातील आंबा, सीताफळ, लिंबु व बागा धोक्‍यात आल्या आहेत. धुलीकणाचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव फळझाडे काढून टाकावी लागली आहेत. इतर पिकाच्या उत्पादनातही घट झाल्याने येथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
मोरांचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर

तर्डोबावाडी परिसरात राष्ट्रीय पक्षी मोरांचे अस्तित्व आहे. कायम होणाऱ्या ब्लास्टिंग आवाजामुळे येथील राष्ट्रीय पक्षी मोरांचे अस्तित्व कमी होत आहे. खाण मालक बोअरिंग ब्लास्टिंगमधून करतात. यामुळे होणारा भूकंपासारखा आवाज येत आहे. त्यामुळे जमिनीला हादरे बसत असल्यामुळे अनेक घरांना तडे गेले आहेत. शाळेच्या भिंतींनाही तडे गेले आहेत. अनेक बोअरवेल व विहिरींचे पाणी कमी झाले आहे. ब्लॉस्टिंगच्या मोठ्या आवाजामुळे लहान मुलांमध्ये बहिरेपणा व धुळीमुळे आजार बळावले आहेत. दगडखाणी बंद व्हाव्यात म्हणून अनेकवेळा तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आली आहेत. यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव केला आहे. परंतु अद्यापही दगडखाणी बंद झाल्या नाहीत. दगडखाणी त्वरित बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)