मुंबई – सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत पुण्यासह देशातील आठ मोठ्या शहरात घरांच्या दरात 11 टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत पुण्यात घरांचा दर 10 टक्क्यांनी वाढला. तर दिल्ली शहरातील घरांचा दर सर्वात जास्त म्हणजे 32 टक्क्यांनी वाढला.
गेल्या 15 तिमाहीपासून या शहरात घरांच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील उमेद कायम असल्याचे मत ही आकडेवारी संकलित करणार्या क्रेडाई, कॉलीअर्स व लियास फोरास या संस्थांनी व्यक्त केली आहे.
या माहितीनुसार दुसर्या तिमाहीत पुण्यातील घरांचे दर 10 टक्क्यांनी वाढून 9,890 रुपये प्रति वर्ग फूट झाले. जे की गेल्या वर्षी या तिमाहीत 9,014 रुपये वर्ग फूट होते. या तिमाहीत मुंबई शहरातील घरांचे दर चार टक्क्यांनी वाढून 20,438 रुपये वर्ग फूट झाले. जे की गेल्या वर्षी या कालावधीत 19,585 रुपये प्रति वर्ग फूट होते.
या आकडेवारी बद्दल बोलताना क्रेडाई या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बोम्मन इराणी यांनी सांगितले की, गेल्या अनेक तिमाहीपासून घरांच्या दरात वाढ होत आहे. याचा अर्थ हे क्षेत्र आगामी काळातही वाढत राहण्याची शक्यता जास्त आहे. मागणी कायम आहे. त्यामुळे विकसकाकडून घरांचे प्रकल्प वाढत आहेत. नजीकच्या काळामध्ये व्याजदरात कपात झाल्यानंतर या क्षेत्रातील आशावाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आठ मोठ्या शहरात दुसर्या या तिमाहीत घरांचे दर 11 टक्क्यांनी वाढून सर्वसाधारणपणे 11,000 रुपये प्रति वर्ग फूट झाले आहेत,. दिल्लीतील घराचे दर सर्वात जास्त म्हणजे 32 टक्क्यांनी वाढून 11,438 रुपये प्रति वर्ग फूट झाले. बंगळूरूतील घरांचे दर 24 टक्क्यांनी वाढून 11,743 रुपये प्रति वर्ग फूट झाले.
पुण्यात घर विक्री वाढली –
दरम्यान नाईट फ्रँक इंडियाने जारी केलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात म्हणजे सणासुदीच्या काळात पुण्यातील घर विक्री वार्षिक पातळीवर 39 टक्क्यांनी वाढून 20,894 युनिट झाली. गेल्या वर्षी ही विक्री 14,983 युनिट होती. ऑक्टोबरमध्ये मुद्रांक शुल्क संकलन 52 टक्क्यांनी वाढून 751 कोटी रुपये झाले असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 495 कोटी रुपये होती.