लॉकडाऊनमुळे संसार येथेच ठेवून नोकरदार गावाकडे; घरमालकांचे फोन
महर्षीनगर – देशव्यापी लॉकडाऊननंतर आता शहरांतील व्यवहार हळूहळू सुरू व्हायला लागले आहेत. परंतु, अद्यापही काहींच्या हाताला काम मिळालेले नाही, असे अनेक नोकरदार, मजूर हे भाड्याची घर, खोली बंद करून गावी गेले आहेत. उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांच्यापुढे महिन्याच्या अन्य खर्चांसह पुण्यातील खोलीचे भाडे चुकते करण्याचा मोठा प्रश्न आहे. दोन महिने गप्प बसलेले घरमालक आता भाडे रकमेसाठी भाडेकरूंना फोन करू लागले आहेत.
लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रातील कंपन्या बंद आहेत. व्यवसाय ठप्प झालेले आहेत. याचा थेट परिणाम सामान्यातील सामान्यांच्या पगारावर झाला आहे. अशा वर्गातील लोक बहुतांशी करून भाडे भरून राहात असतात. सेल्स, मार्केटिंगमध्ये असलेल्या नोकरदारांना तर टार्गेटनुसार वेतन मिळते, त्यांच्या मासिक उत्पन्नावर तर थेट परिणाम झाला आहे. यामुळे भाडे कसे भरायचे असा प्रश्न नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थी यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
पुण्यातील एका भाडेकरूने ही समस्या मांडताना सांगितले की, बिबवेवाडी भागात खोलीचे भाडे भरून राहतो. खासगी कंपनीमध्ये सेल्स विभागात नोकरीला आहे. माझा पगार नऊ हजार आहे. सेल्समध्ये असल्याने वेगवेगळे भत्ते आणि काम असं मिळून 30 हजार रुपये पडतात. पण, आता सगळेच व्यवहार बंद असल्याने फक्त 9 हजार एवढी बेसिक सॅलरी मिळाली. पण, माझं घरभाडंच 10 हजार रुपये आहे. मी आता इतकी मोठी रक्कम भाडं म्हणून कसं भरू? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. घरभाडं न भरल्यास डिपॉझिटमधून कापून घेण्याची भूमिका घरमालकांनी घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ओझे…
शिक्षणासाठी आलेली अनेक मुले कॉट बेसीस किंवा स्वतंत्र खोली घेऊन राहतात. सध्या, हे विद्यार्थी गावी गेले आहेत. महाविद्यालये तसेच क्लासेसही बंद आहेत. परंतु, या विद्यार्थ्यांना भाडे भरावे लागत आहे. अनेकांची आर्थिक स्थिती बेताची आहे, त्यातच लॉकडाऊनमुळे कुटुंबीयांचे उत्पन्नही कमी झाले आहे, अशा अवस्थेत विद्यार्थ्यांच्या डोक्यावर भाडे रकमेचे ओझे आहे.