औरंगाबाद : घर बघावे बांधून …! अशी म्हण मराठीमध्ये प्रचलित आहे. मोठ्या कष्टाने घर बांधून पुढे काही समस्या येत असतील तर मात्र माणूस निराश होऊन जातो. अशाच प्रकारे पावसाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी औरंगाबादेतील एकाने चक्क जॅक लावून चार फूट घर उंच उचलले आहे. कोणत्याही समस्येमुळे घर न पाडता तंत्रज्ञानाचा वापर करून घर उचलण्याचे प्रयोग परदेशात सर्रास होताना दिसतात. मात्र महाराष्ट्रातही असे प्रयोग आता होऊ लागले आहेत.
औरंगाबादेतील आनंद कुलकर्णी यांनी हा प्रयोग केला आहे. त्यामुळे त्यांच्या घराचा विषय सध्या चर्चेत आहे. घर न पाडता त्यांनी घर उचलण्याचा पर्याय निवडला. २०२१ मध्ये आनंद कुलकर्णी यांनी २००० स्केअर फुटाचे घर बांधले होते. मात्र बाजूचा रस्ता उंच आणि घर खाली अशी अवस्था झाल्यामुळे त्यांनी या समस्येचे समाधान म्हणून घर न पाडता हे घर जॅक लावून उचलण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी पुण्यातही असा प्रयोग झाला आहे.
कोणतेही नुकसान न होता घर जॅक लावून उचलणे म्हणजे मोठ्या जोखमीचे काम होते. या कामाकरिता त्यांनी हरियाणाच्या एका कंपनीला संपर्क केला. ५ मे पासून या कमला सुरुवात झाली. ज्या पद्धतीने एखादया गाडीला जॅक लावला जातो अगदी त्याच पद्धतीने घराला जॅक लावले गेले. भिंतीच्या बाजूने आधी २-२ फूट खड्डा खणून बीम लागल्यानंतर मग जॅक लावला गेला आणि घर उचलले गेले.
किती येतो खर्च ?
अद्यापही आनंद कुलकर्णी यांचे हे घर उचलण्याचे काम सुरूच आहे. काही दिवसात हे काम पूर्ण होईल. हे घर उचलण्यासाठी एकूण २५० जॅक लावण्यात आले. आता मोठा प्रश्न येतो की यासाठी नेमका खर्च किती आला असेल ? तर हे संपूर्ण घर उचलण्यासाठी चार ते साडेचार लाखांचा खर्च येत आहे. ४० दिवसांमध्ये हा प्रयोग पूर्णत्वास येतो .