राहिमतपूर, दि. 17 (प्रतिनिधी) – वाठार (किरोली), ता. कोरेगाव येथील निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र पांडुरंग मिरोखे यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप, कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी एक लाख 77 हजार रुपये किमतीच्या, साडेतीन किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू, घड्याळ, किमती साड्या व अन्य कपडे लंपास केले. या प्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आली आहे. ठसे तज्ज्ञांनी बंगल्यातील ठसे घेतले आहे. ही चोरी होऊन अनेक दिवस लोटले असून चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
सेवानिवृत्तीनंतर रामचंद्र मिरोखे (वय 72) यांनी वाठार (किरोली) येथे शेतीवाडीत लक्ष घातले असून गावात बंगला बांधला आहे. ते काही कामास्तव 5 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता कराड येथे वास्तवास असलेल्या कुटुंबीयांकडे रहायला गेले होते. ते जवळपास दीड महिन्याने काल (दि. 16) रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान वाठार किरोलीत परतले. त्यावेळी बंगल्याचे कुलूप व कडीकोयंडा तुटलेला दिसला. मिरोखे यांनी बंगल्यात जाऊन तपासणी केली असता, चोरट्यांनी एक लाख 77 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.
कोरेगावचे पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे व सपोनि घनशाम बल्लाळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. हवालदार मोहन कुलकर्णी तपास करत आहेत. दरम्यान, चोरट्यांनी बंगल्यातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले होते. आणखी किमती वस्तू हाती न लागल्याने त्यांनी धान्यांचे डबे तपासताना धान्य सर्वत्र सांडले होते. बंगल्यात असलेल्या रायफलची काडतुसे चोरीला गेल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला होता; पोलिसांनी शोध घेतला असता, ही काडतुसे घरातच सापडल्याने मिरोखे यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.