नगर (प्रतिनिधी) -करोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने मावा विक्री करणाऱ्या टपऱ्या देखील बंद आहे. त्यामुळे चोरून मावा विक्री करणाऱ्यांचा सध्या सुळसुळाट झाला आहे. घरपोहच मावा विक्री करणाऱ्या एकास जेरबंद करण्यात आला आहे. त्याच्याकडून 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कल्याण विठू ससे (वय-31, रा. जेऊर बायजाबाई, ता. नगर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून 20 पिशव्या मावा व एक दुचाकी, असा 78 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके व आरसीपी पथक कोठला परिसरात गस्त घालत होते.
यावेळी एक व्यक्ती दुचाकीवरून गोणी घेऊन जाताना आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे तंबाखूपासून तयार केलेल्या माव्याच्या 20 पिशव्या मिळून आल्या. पोलिसांनी ससे याला अटक केली असून, त्याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.