नगर: सुरक्षेच्यादृष्टीने ओळखपत्राशिवाय राहण्यास परवानगी देणाऱ्या हॉटेल, लॉजचालकांवर कारवाई सुरू झाली आहे. जिल्हा विशेष शाखेचे दहशतवाद विरोधी सेल (एटीसी) शहरातील नगर-मनमाड महामार्गावरील त्रिमूर्ती लॉजमध्ये तपासणी केली असता प्रवाशांना ओळखपत्राविना रूम दिल्याने लॉजमालक राहुल दामू मेहेत्रे (वय 45,रा.बोल्हेगाव फाटा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात जिल्हा दहशतवादी विरोधी सेलकडून हॉटेलची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. लॉजमध्ये राहण्यास परवानगी देताना प्रवाशांचे ओळखपत्र घेतल्याशिवाय रूम देण्यात येवू नये असे आदेश आहेत. परंतु अनेक लॉजमालक आदेशाचे उल्लंघन करताना आढळून येत आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात होण्याची शक्यता लक्षात घेवून एटीएसचे पथक सतर्क झाले आहे. अनेक दहशतवादी कारवाया हॉटेल, लॉजमधूनच झाल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे लॉजचालकांनी नियमांचे पालन करावे, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.