नियम मोडणाऱ्यांवर पालिकेच्या पथकाकडून कडक कारवाई
शहराच्या दक्षिण भागातून ‘दणक्यात’ सुरुवात
कात्रज -धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून हॉटेल उपहारगृह, रेस्टॉरंटमध्ये नियमांचे योग्य पालन केले जाते का? याची तपासणी पथकाकडून सुरू आहे. सहाय्यक आयुक्तांच्या आदेशानुसार शहराच्या दक्षिण भागातून सदर मोहीम सुरू करण्यात आली आहे.
परिसरातील नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, बारसह खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवरही साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. आज, 7 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच शुक्रवारी (दि. 9) एकूण 10 हॉटेल आस्थापनांवर केलेल्या कारवाईत 19 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून एकूण 26 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
हॉटेल चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे आणि या भागातील नियंत्रणात येत असलेल्या करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. या उद्देशाने ही कारवाई करण्यात येत आहे. यामुळे दंड वसूल करताना, सर्व हॉटेल उपहारगृहे रेस्टॉरंट चालकांना नियम समजावून सांगितले जात आहेत. ज्या हॉटेल चालकांना नियमांची माहिती हवी किंवा काही शंका असतील तरी त्यांनी क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम यांनी केले आहे. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक नरेंद्र भालेराव, आरोग्य निरीक्षक एकनाथ माने, अतिक्रमण निरीक्षक श्रीकृष्ण सोनार आदी कर्मचाऱ्यांचे पथक ही कारवाई करीत आहे.
व्हॉटस्ऍप ग्रुपवर माहिती…
करोना प्रसार होऊ नये. यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, बार आदींबाबत करण्यात आलेल्या नियमांची माहिती सर्व हॉटेल चालकांना मिळावी. यासाठी व्हॉट्सऍप ग्रुप तयार करण्यात आला असून त्यावर दैनंदिन अपडेटही देण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.