पुणे : पुण्यातील धायरी येथे हॉटेल व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी कामगार हॉटेल उघडण्यास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. लॉकडाऊन कालावधीत हॉटेल व्यवसायात मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने त्याने हे पाऊल उचलले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
प्रेमनाथ शेट्टी (वय 43, रा. धायरी) असे आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमनाथ शेट्टी यांचे धायरी भागात राज हॉटेल आहे. मागील सात वर्षांपासून ते हॉटेल चालवीत होते. मागील काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते. दरम्यान, हॉटेल मध्येच त्यांनी सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. गुरुवारी दि. 25 जून रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कामगार हॉटेल उघडण्यास आल्यानंतर त्यांना हॉटेलमध्ये मालकाने गळफास घेतल्याचे दिसून आले.