राहाता (प्रतिनिधी) -हॉटेल व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना राहाता शहरानजिक गोदावरी कॅनॉलचे कडेला हॉटेल लोकसेवा जवळ पिंपळस हद्दीत शनिवारी (दि.23) दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेत हॉटेल व्यावसायिक नदीम रौफ सय्यद (वय 24) हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याचेवर शिर्डी येथे उपचार सुरू आहेत
याबाबत अधिक माहिती अशी, आपल्या घरच्यांना शेजारचे बोलल्याचा राग मनात ठेवून आरोपी सचिन उत्तम पवार (वय 20, रा.पिंपळस) हा शेजारी राहणारे हॉटेल व्यावसायिक नदीम रऊफ सय्यद (वय 24) याचे घरी गेला व नदीम सय्यद यास शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देऊन आरोपी पवार याने सय्यद याचेवर कुऱ्हाडीने हल्ला केला.
यामध्ये नदीम सय्यद याचे डोक्याला, कानाजवळ व पाठीला कुऱ्हाड लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. याप्रकरणी जखमी नदीम रौफ सय्यद याचे फिर्यादीवरून राहाता पोलीसांनी आरोपी सचिन पवार याचे विरुध्द गुन्हा दाखल केला असून आरोपी सचिन पवार यास पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कंडारे हे करीत आहे.
——————