पुणे : फेअरवेल पार्टीकरिता एका हॉटेलमध्ये गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणात हॉटेल मालकाला अटकपूर्व जामीन मंजुर करण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन सोनवणे यांनी हा आदेश दिला आहे.
रोहन निम्हण असे अटकपूर्व जामीन मंजुर करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून ते ठिकाणा हॉटेलचे मालक आहेत. बचाव पक्षातर्फे ऍड.पुष्कर पाटील, ऍड. प्रसाद भोसले आणि ऍड. अनुज मंत्री यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.
महाबळेश्वर चौकातील ठिकाणा हॉटेलमध्ये 27 फेब्रुवारी रोजी एका महाविद्यालयाचे 150 विद्यार्थी फेअरवेल पार्टीसाठी गेले होते. यावेळी गाणी बंद करण्यावरुन विद्यार्थी आणि बाऊन्सर यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर पुढे मारहाणीत झाले. यानंतर हॉटेलच्या मॅनेजरने त्या विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल केली. तसेच प्रतीक कदम या विद्यार्थ्याने हॉटेलचे बाऊंन्सर व मालकाविरोधात तक्रार दाखल केली होती.
यानंतर निम्हण याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. सुरूवातीला अंतरिम आणि नियमित अटकपूर्व जामीन मंजुर करण्यात आला आहे. दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर गुरूवारी पोलीस स्टेशनला हजरी लावणे, तपासास सहकार्य करणे, पुराव्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, या आणि अशा विविध अटींचा यामध्ये समावेश आहे.