लखनऊ – लखनौमधील हजरतगंज भागातील एका हॉटेलला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन महिलांसह चौघांचा होरपळून मृत्यू झाला असून 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. या आगीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांच्या संयुक्त समितीला चौकशीचे आदेश दिले आहेत.
गुरनूर सिंग आनंद, साहिबा कौर उर्फ जसप्रीत, श्राविका संत आणि अम्मार गाझी अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, हजरतगंजमधील मदन मोहन मालवीय मार्गावरील लिवाना हॉटेलमध्ये सकाळी 7 वाजेच्या सुमारास आग लागली.
ही आग हॉटेलच्या दुस-या मजल्यावर लागल्याने धुरामुळे अनेकजण खोल्यांमध्ये अडकले. त्यामुळे अनेक जण बेशुद्ध झाले. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. 20हून अधिक जणांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात अग्निशम दलाला यश आले आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनीही तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला भेट देत जखमींची विचारपूस केली. तसेच या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषींना सोडले जाणार नाही, असे सांगितले.