शहरातील आठशे हॉटेल्सची दैनंदिन अडीच ते चार कोटींची उलाढाल ठप्प
पिंपरी – गेल्या दोन-तीन महिन्यांपासून हॉटेल व्यवसाय पूर्ववत स्थिरस्थावर होत असताना आता पुन्हा हॉटेल व्यवसाय आर्थिक चक्रव्यूहात सापडला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरुवातीला रात्री आठनंतर हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, आता थेट सात दिवसांसाठी हॉटेल, रेस्टॉरंट “लॉक’ राहणार आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
गेल्या वर्षी 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर जवळपास आठ ते नऊ महिने हॉटेल व्यवसाय बंद होता. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हॉटेल व्यवसाय पूर्वपदावर येत होता. मात्र, 28 मार्चला रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत हॉटेल, दुकाने, मॉल्स आदी बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
हॉटेल व्यावसायिकांकडे रात्री जेवणासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठे असते. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. गेल्या काही दिवसांपासून हे उत्पन्न घटले होते. आता तर, करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शनिवारपासून पुढील सात दिवसांसाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, बियर बार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसमोरील आर्थिक संकट गहिरे होत आहे.
हॉटेल्सची कोट्यवधींची उलाढाल थंडावणार
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये छोटे-मोठे 800 हॉटेल्स आहेत. प्रत्येक हॉटेलचे दररोजची सरासरी उलाढाल 10 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यानुसार 800 हॉटेल्सची दररोजची सरासरी उलाढाल अडीच ते चार कोटी रुपयांपर्यंत आहे. ही उलाढाल पूर्णत: थंडावणार आहे. हॉटेल्सना पार्सल देण्यास परवानगी असणार आहे. मात्र, त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याचा दावा हॉटेल व्यावसायिकांनी केला आहे.
हॉटेल व्यावसायिक अडचणीत
हॉटेल व्यावसायिकांना करोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा यापूर्वीच मोठा फटका बसला आहे. त्यांना वीज बिल किंवा अन्य करांमध्ये सवलत मिळालेली नाही. हॉटेल व्यावसायिकांना बॅंकाचे हप्ते, कामगारांचे पगार देता देता नाकीनऊ आले. लॉकडाऊनमुळे 80 ते 85 टक्के व्यवसाय थंडावला होता. गेल्या दोन-तीन महिन्यात ही परिस्थिती सावरत असतानाच पुन्हा सात दिवसांसाठी हॉटेल व्यवसाय बंद पडणार आहे.
रात्री आठनंतर हॉटेल्स बंद करण्यास सांगितल्याने हॉटेल व्यवसायाचे उत्पन्न निम्म्याने घटले होते. आता तर, सात दिवसांसाठी हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे हा व्यवसाय पूर्णत: थंडावणार आहे. या निर्णयामध्ये बदल करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहोत.
– पद्मनाभन शेट्टी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन.
लॉकडाऊनमुळे आधीच हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला होता. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून हा व्यवसाय स्थिरावत असताना आता हॉटेल्स आठवडाभरासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याचा गंभीर परिणाम हॉटेल व्यवसायावर होणार आहे. आम्ही याला कडाडून विरोध करणार आहोत. शासकीय नियमांचे पालन करून प्रसंगी याविरूद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका घेण्यात येईल.
– गोविंद पानसरे, कार्याध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवड