पुणे – शहरात गेल्या दोन दिवसांपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. सकाळी कडक ऊन पडल्याने उकाडा वाढतो, मात्र दुपारनंतर पावसाच्या सरी काही प्रमाणात होत असून गारवा वाढतो आहे.
गेले आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. पुण्यातही शुक्रवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर शनिवारी सायंकाळी मात्र हलक्या सरी झाल्या. रविवारीदेखील अशीच परिस्थिती होती. सोमवारी मात्र पुन्हा सकाळी कडक उन्हाचे चटके जाणवत होते. दुपारनंतर मात्र अचानक हवामानात बदल होऊन आकाशात ढगाची गर्दी जमा होऊन गारवा वाढला. काही भागात पावसाच्या हलक्या सरी झाल्या. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शहरात आगामी दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे.