हॉट सीट :  लढत दोन खेळाडूंमधील 

जयपूर ग्रामीण (राजस्थान)

राजकीय हवा बदलतीय?

राठोड यांनी 2014 मध्ये पहिल्यांदाच निवडणुका लढवल्या; पण तेव्हा असलेल्या मोदी लाटेमुळे आणि राज्यातही भाजपाचे सरकार असल्यामुळे त्यांचा विजय सुकर बनला. या मतदारसंघांतर्गत विधानसभेच्या आठ जागा आहेत. यापैकी पाच जागा त्यावेळी भाजपाकडे होत्या. तर कॉंग्रेसकडे दोन आणि अपक्षांकडे एक होती. गेल्या पाच वर्षांत राठोड यांना मतदारसंघाचा पूर्णतः अंदाज आला आहे. तथापि, त्यांना बदललेल्या राजकीय समीकरणांचे आव्हान आहे. राजस्थानात आता कॉंग्रेस सत्तेत आहे आणि जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा कॉंग्रेसच्या ताब्यात आहेत. तर भाजपाकडे अवघ्या दोन विधानसभा आहेत. उर्वरित एक जागा अपक्षाकडे होती, पण तोही कॉंग्रेसमध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळे कॉंग्रेसची मतदारसंघातील ताकद वाढली आहे. साहजिकच राठोड यांना यंदाचा विजय सोपा नाही.

क्रीडा विश्‍वातील खेळाडूंनी राजकारणाच्या मैदानावर येऊन नशीब आजमावण्याची परंपरा तशी खूप जुनी आहे. पण जेव्हा वेगवेगळ्या क्रीडाप्रकारातील दोन खेळाडू-तेही ऑलिम्पिकमध्ये ठसा उमटवून आलेले – निवडणुकीच्या रणांगणात समोरासमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकतात तेव्हा साहजिकच सर्वांचेच लक्ष या लढतीकडे लागते. सध्या ही स्थिती निर्माण झाली आहे राजस्थानातील जयपूर ग्रामीणमध्ये.

या लोकसभा मतदारसंघातून एका खेळाडूचे निवडणूक लढवणे आधीच निश्‍चित झालेले होते; पण कॉंग्रेसने खेळाडूसमोर खेळाडू अशी नीती अवलंबत दुसऱ्या खेळाडूला मैदानात उतरवले आणि अचानक “सामन्या’ची रंगत वाढली. हे दोन खेळाडू आहेत राज्यवर्धन राठोड आणि कृष्णा पुनिया. ऑलिम्पिकमध्ये डबल ट्रॅप शूटिंग प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवूून देणारे राठोड हे केंद्रीय मंत्री राहिले आहेत; तर कृष्णा पुनियाने थाळीफेक क्रीडाप्रकारात सहाव्या स्थानापर्यंत मजल मारून एक वेगळा ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे, आपल्याला राठोड यांच्याविरोधात लोकसभेच्या रणांगणात उतरवण्यात येईल, याची जराही कल्पना कृष्णा पुनियाला नव्हती. कॉंग्रेसची उमेदवारांची यादी घोषित झाली आणि तिला याबाबत समजले. दुसरीकडे भाजपाने मात्र आपल्या जुन्याच उमेदवाराला त्याच मतदारसंघात संधी देत जागा शाबित ठेवण्याचे धोरण अवलंबले.

राज्यवर्धनसिंग राठोड यांना पाच वर्षांचा संसदीय कामाचा, राजकारणाचा अनुभव गाठिशी असला तरी कृष्णा पुनियाही राजकारणापासून अलिप्त नाहीत. कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या कृष्णा सादुलपूरच्या आमदार आहेत. तथापि, जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी तसा नवखा आहे. भाजपा समर्थकांचे म्हणणे आहे की, राठोड यांच्या “निशाणा’ अचूक लागेल आणि ते विजयी होतील; तर कॉंग्रेस म्हणते की यावेळी कृष्णा पुनिया ही जागा “थ्रो’ करतील.

2014 मध्ये या लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानतर राज्यवर्धनसिंग राठोड हे सातत्याने सोशल मीडियावर सक्रिय राहिलेले दिसून आले. तरुणवर्गामध्ये त्यांचा एक वेगळाच करिष्मा आहे. अशा परिस्थितीत नव्या लोकसभा मतदारसंघात येऊन आपली पहिली लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या पुनियांना स्थानिक जनतेचा विश्‍वास संपादित करण्यासाठी बरेच झगडावे लागणार आहे. राजस्थानात विधानसभा निवडणुकांमध्ये सत्तांतर झाल्यानंतर एकंदरीतच राजकीय वातावरण बदलल्याचे दिसत आहे.

या वातावरणामुळे पुनियांची वाट काहीशी सुकर होणार आहे. राठोड यांनी आपल्या प्रचारामध्ये भारताकडून अंतराळात केल्या गेलेल्या यशस्वी मोहिमा, एअर आणि सर्जिकल स्ट्राईक आणि मोदी सरकारच्या इतर योजना आणि उपलब्धी यांचा पाढा वाचून दाखवत मतदारांना आकृष्ट करत आहेत; तर दुसरीकडे पुनिया यांच्याकडून शेतकऱ्यांची दुर्दशा, बेरोजगारी, विचारधारा आणि लोकशाही वाचवण्याचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. मतदारसंघासाठी कृष्णा पुनियांचा चेहरा नवखा असला तरी क्रीडाक्षेत्रात नाव कमावल्यामुळे लोक त्यांना ओळखून आहेत.

विशेष म्हणजे राठोड आणि पुनिया या दोघांनीही 2013 मध्ये राजकारणात प्रवेश केला. भाजपात सामील झाल्यानंतर राठोड यांनी सुरुवातीपासून केंद्रातील राजकारणात सहभाग घेतला. तर पुनिया यांना पहिल्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. पण गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या आणि कॉंग्रेसच्या आमदार बनल्या.

मतदार संघातील जातीय समीकरणे

-जयपूर ग्रामीण मतदारसंघात एकूण 19.5 लाख मतदार आहेत.
-या मतदारसंघात जाट आणि राजपूत समाजाचे मतदार अधिक आहेत.
-राठोड यांना राजपूत समाजाचा, तर पुनियांना जाट समाजाचा पाठिंबा मिळत असल्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.
-जाटबहुल क्षेत्रात ब्राह्मण, यादव आणि अनुसुचित जातीचे मतदारही आहेत.
-2014 मध्ये राज्यवर्धन राठोड यांनी आपले प्रतिस्पर्धी जोशी यांना 3,32,896 मतांच्या फरकाने पराभूूत करत   दणदणीत विजय मिळवला होता. तथापि, 2009 मध्ये या जागेवरुन कॉंग्रेसचे लालचंद कटारिया विजयी झाले होते  आणि ते पुढे युपीए सरकारमध्ये मंत्रीही झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.