बांधकाम कामगारांना फक्‍त 5 रुपयांत गरम जेवण

‘अटल आहार योजने’ला प्रारंभ : नोंदणी झालेल्या मजुरांना लाभ

पुणे – दिवसभर अंगमेहनतीचे काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना आता कामाच्या ठिकाणी केवळ 5 रुपयांत दुपारचे जेवण उपलब्ध होणार आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दररोज स्वच्छ आणि गरम जेवण मिळावे यासाठी सरकारने सुरू केलेल्या “अटल आहार योजने’ला गुरूवारी “क्रेडाई’ पुणे मेट्रोच्या सहकार्याने पुण्यात प्रारंभ करण्यात आला.

बाणेर येथील एका बांधकाम साईटवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात 400 हून अधिक नोंदणीकृत बांधकाम कामगारांना जेवण पुरवून योजनेचे उद्‌घाटन करण्यात आले.

कामगार उपजिल्हा कार्यकारी अधिकारी शीतल निकम, कामगार अधिकारी एम. ए. मुजावर, क्रेडाई पुणे मेट्रो कुशल उपक्रम तसेच कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, निमंत्रक पराग पाटील, सदस्य समीर बेलवलकर, मिलिंद तलाठी, इंद्रनील मुजुगुले, कल्पतरू प्रकल्पाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नीलकंठ सरदेसाई, विश्‍वास कदम, संजय चव्हाण, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी या वेळी उपस्थित होते. बांधकाम प्रक्रियेत कामगाराची भूमिका मूलभूत आणि महत्त्वाची असते. त्यांना वेळेवर आणि चांगले अन्न नाममात्र दरात उपलब्ध होणे गरजेचे होते. क्रेडाई पुणे-मेट्रोच्या माध्यमातून ही योजना राबवण्यासाठी शासनाला यापुढेही पूर्ण सहकार्य दिले जाईल, असे श्रॉफ यांनी सांगितले. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत (बीओसीडब्ल्यू) कामगाराने नोंदणी करून दरवर्षी नोंदणीचे नूतनीकरण करणे आवश्‍यक असल्याचे मुजावर म्हणाले.

“क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांच्या मार्गदर्शनातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून, सर्व कामगारांना नियमितपणे जेवणाची सुविधा प्राप्त होईल याची काळजी घेऊ, असे सरदेसाई यांनी सांगितले. समीर बेलवलकर यांनी सूत्रसंचालन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.