माळीवाड्यातील रुग्णालयाची झाडाझडती

कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्याचे आदेश

नगर  – महापालिकेच्या माळीवाडा येथील रुग्णालयास महापौर बाबासाहेब वाकळे यांनी गुरुवारी दुपारी अचानक भेट देवून पाहणी केली. यावेळी रुग्णालयात केवळ एकच महिला कर्मचारी आढळून आल्या. तर इतर कर्मचारी गायब होते. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा काढण्याचे आदेश महापौर वाकळे यांनी यावेळी दिले.

महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेवर व्हावीत, यासाठी कार्यालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडणे गरजेचे आहे. परंतु अनेक कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याच्या तक्रारी महापौर वाकळे यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी मध्यंतरी महापालिकेच्या विविध विभागांना अचानक भेटी देण्याची मोहिम सुरू केली होती. या मोहिमेचा धसका अधिकारी – कर्मचाऱ्यांनी घेतल्याने कार्यालयीन कामकाजात सुरळीतपणा आला होता. मात्र माळीवाडा येथील रुग्णालयाबाबत नागरिकांनी तक्रारी केल्याने महापौर वाकळे यांनी या केंद्रास अचानक भेट दिली.

तेव्हा तेथे एकच महिला कर्मचारी उपस्थित होती. इतर कर्मचाऱ्यांचा पत्ता नव्हता.त्यानंतर त्यांनी हजेरीपत्रक तपासले असता एकच व्यक्ती स्वाक्षऱ्या करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे संतापलेल्या महापौर वाकळे यांनी आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना याबाबत तातडीने कार्यवाही करुन संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजवा आणि त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा न आल्यास त्यांच्यावर पुढील कारवाई करा, असे आदेश दिले. आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्याशीही संपर्क साधून या प्रकरणात लक्ष घालण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.