लाहोर – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाकिस्तानला नया पाकिस्तान बनवण्याच्या प्रयत्नात असले तरी देशात अनेक चित्रविचित्र घटना घडताना दिसत आहेत.
लाहोरमधील एका मोठ्या रुग्णालयामध्ये चक्क सुरक्षारक्षकाने एका महिलेची शस्त्रक्रिया केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने हात झटकले असून एवढ्या मोठ्या रुग्णालयात सर्वच गोष्टींवर नजर ठेवणे शक्य नसल्याचा अजब दावा केला आहे. लाहोरमधील प्रख्यात मेयो हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. या महिलेचे वय 80 वर्ष होते तिचे नाव शामिमा बेगम असे आहे.
काही महिन्यापूर्वी तिच्या पाठीमध्ये दुखत असल्यामुळे ती मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. याच कालावधीमध्ये हॉस्पिटल मधील एका सुरक्षारक्षकाने तिच्या पाठीवर शस्त्रक्रिया केली. महंमद वहीद बट असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. डॉक्टर असल्याची बतावणीही या सुरक्षारक्षकाने त्या संबंधित महिले समोर केली होती. शस्त्रक्रिया करताना वहिदने हॉस्पिटल मधील ऑपरेशन थिएटर आणि इतर सर्व उपकरणांचा वापर केला होता.
नियमानुसार या महिलेच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलचे सर्व बिल चुकते केले आणि तिला घरी पाठवण्यात आले घरी गेल्यावर जेव्हा तिच्या पाठीचे दुखणे जास्तच वाढले. तेव्हा नातेवाईकांनी पुन्हा एकदा रुग्णालयाशी संपर्क साधला तेव्हा ही गोष्ट समोर आली आणि त्याच दरम्यान या महिलेचा मृत्यूही झाला. त्यानंतर या सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली असली तरी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने मात्र हात झटकून टाकले आहेत.
रुग्णालयातील सर्वच घटकांवर नियंत्रण ठेवणे आम्हाला शक्य नाही असा दावा त्यांनी केला आहे. एक सुरक्षारक्षक या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून वावरत असेल तर ही गोष्ट व्यवस्थापनाच्या कशी लक्षात आली नाही असा सवाल आता पाकिस्तानमधील माध्यमे करत आहेत.