ऑनलाइन चर्चा : विरोधकांकडून टीका, तर सत्ताधाऱ्यांकडून समर्थन
आता प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची प्रतीक्षा
पुणे – महापालिका स्थायी समितीच्या सुमारे 8 हजार 350 कोटींच्या अंदाजपत्रकास दोन दिवसांच्या ऑनलाइन सभेतील चर्चेनंतर गुरुवारी मान्यता देण्यात आली. यावेळी अंदाजपत्रकातील तरतुदी तसेच महापालिकेच्या उत्पन्नावरून सर्वच विरोधी पक्ष नेत्यांनी टीका केली.
अंदाजपत्रकात केवळ ठेकेदारांचा विचार केला असून महापालिकेचे बहुतांश प्रकल्प पीपीपीवर करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांना शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार आणि महापालिकेच्या विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी तीव्र आक्षेप घेतला.
गेल्या साडेचार वर्षांत महापालिकेचे उत्पन्न साडेचार कोटींवरच रखडलेले असताना, 8 हजार कोटींचे अंदाजपत्रक मांडून भाजपने पुणेकरांची फसवणूकच केल्याचे धुमाळ म्हणाल्या. तसेच पैसे नसताना अवसान आणून खासगी सहभागातून कामे करणे आणि कर्ज काढून विकासकामे करण्याचा घाट महापालिका प्रशासन घालत असल्याची टीका त्यांनी केली.
सभागृह नेते बीडकर यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. “शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश अंदाजपत्रकात आहे. आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी ठोस उपाय सूचवले आहेत.
रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, जायका प्रकल्प, अद्ययावत कॅन्सर रुग्णालय, युरॉलोजी हॉस्पिटल यांसह पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपच्या माध्यमातून विविध भागातील रस्ते, उड्डाणपूल असे अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचे नियोजन आहेत. अंदाजपत्रकात सूचविलेल्या सर्व योजनांची पूर्तता करू.’