मथुरा जिल्ह्यातील यमुना एक्स्प्रेसवेवर आज शुक्रवार रोजी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मध्य प्रदेशातील चार पोलिसांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यमुना एक्स्प्रेसवेवरील पुलाला धडकल्यानंतर नियंत्रण सुटून बोलेरो गाडीला हा अपघात झाला आहे.
या अपघातात पोलिस हवालदार भवानी प्रसाद, महिला कॉन्स्टेबल हिरा देवी, चालक जगदीश, पोलीस मित्र रवी कुमार यांचा मृत्यू झाला. तर कॉन्स्टेबल कमलेंद्र यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रतिराम, धर्मेंद्र कुमार आणि प्रीती हे जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील टिकमगडच्या भुदेरा पोलीस ठाण्याचे पोलीस पथक अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी हरियाणातील बहादूरगड येथे जात असताना हा अपघात झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच सुरीर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे एक्सप्रेसवेची एक लाईन बंद करण्यात आली होती. आग्राहून नोएडाला जात असताना हा अपघात झाला.
शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातानंतर यमुना एक्सप्रेस वेवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून क्रेनच्या साहाय्याने अपघात झालेली बोलेरो हटवून रस्ता सुरळीत केला.