Horoscope | उत्सुकता भविष्याची (रविवार : 20 जून 2021)

मेष : कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. व्यवसायात योग्य व्यक्‍तींची निवड. तुमचे कष्ट कमी करेल. फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य द्याल. नोकरीत हातातील कामे पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळाल. पैशाची चिंता मिटेल. महिलांना कामात विचार करून त्याप्रमाणे कृती करावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रकृतीमान सुधारेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची उजळणी करावी. विद्यार्थ्यांनी जादा आत्मविश्‍वास बाळगू नये.

वृषभ : ग्रहांची साथ मिळाल्याने मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसायात डोक्‍यावरचे ओझे खांद्यावर आल्याने हायसे वाटेल. मानसिक आरोग्य चांगले राहील. नोकरीत कार्यतत्पर राहाल. सहकारी व वरिष्ठांच्या पसंतीस उतराल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांना घरातील व्यक्‍तींची मने जिंकता येतील. उमेद वाढेल. नोकरदार महिलांची प्रगती होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात पूरक वातावरण लाभेल

मिथुन: “प्रयत्ने वाळूचे…’ ही म्हण सार्थ ठरवाल. व्यवसायात आलेल्या अडचणींवर मात करून यश मिळवाल. कार्यक्षमता वाढवून कामातील प्रगतीचा वेग वाढवाल. पैशाची तजवीज होईल. नोकरदार मंडळींना मनाप्रमाणे काम केल्याचे समाधान मिळेल. विरोधक सौम्य भाषेत बोलतील. जादा कामातून पैसे मिळवता येतील. महिलांना आवडत्या छंदात मन रमवता येईल. उत्साही राहतील. विद्यार्थ्यांना केलेल्या कष्टाचे फळ मिळेल.

कर्क : कर्तव्य श्रेष्ठ मानून कामाचा उरक पाडाल. व्यवसायात तुमच्या आत्मविश्‍वासाचा फायदा होईल. नवीन आव्हाने स्वीकारून वेळेत पूर्ण कराल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. कामातील यशामुळे वरिष्ठ व सहकारी कौतुक करतील. महिलांचा वेळ कर्तव्यपूर्ती करण्यात जाईल. प्रियजनांच्या भेटीने आनंद वाटेल. प्रकृतीमान चांगले राहील. विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करता येईल.

सिंह : पैशाचे व्यवहार मनाप्रमाणे होतील. त्यामुळे आनंदी राहाल. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन ठेवून कामे मार्गी लावाल. नवीन कामे मिळतील त्यासाठी अधिक गुंतवणूक करावी लागेल. नोकरीत कामानिमित्ताने प्रवासाचे योग येतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांना खर्च आटोक्‍यात ठेवून चार पैसे शिल्लक टाकता येतील. अध्यात्म व चिंतन यात बराच वेळ जाईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. विद्यार्थ्यांनी समयसूचकता पाळणे आवश्‍यक आहे.

कन्या : ग्रहमान संमिश्र फलदायी राहील. व्यवसायात वेळेचा उपयोग चांगला होईल. महत्त्वाची कामे गती घेतील. नोकरीत कामाच्या बाबतीत नवीन कल्पना सुचतील. मनाप्रमाणे कामे करता येतील. कलावंत, खेळाडूंना खेळात प्रसिद्धी मिळेल. महिलांना सामंजस्याने घरातील प्रश्‍न सोडवता येतील. नवीन वस्तू खरेदी करता येईल. तब्येतीच्या तक्रारीही दूर होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाला मूड चांगला राहील. आत्मविश्‍वासाने विद्यार्थ्यांनी पेपर सोडवावा. यश हमखास मिळेल.

तूळ :  थोडी सबुरी ठेवलीत तर भविष्यात फायदा मिळेल. व्यवसायात पूर्वीच्या चुका दुरूस्त करण्याची संधी मिळेल. अशक्‍य वाटणारी कामे शक्‍य करून यशप्राप्ती कराल. नोकरीत सरकारी कामे मार्गी लागतील. रेंगाळलेले प्रश्‍नही मार्गी लागतील. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून निर्णय घ्याल. महिलांची थोडीशी द्विधा मनःस्थिती होईल. संयमाने वागावे लागेल. घरात मुलांच्या मागण्या, हट्ट पुरवण्यासाठी पैसे खर्च होतील. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यास करावा.

वृश्‍चिक : तुमचा आशावाद तुम्हाला व्यवसायात यश मिळवून देईल. पूर्वी केलेल्या कामातून आता पैसे मिळतील. येणी वसूल होतील. पैशाची ऊब मानसिक आरोग्य चांगले राखेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत, जोडधंद्यात विशेष लाभ होईल. परदेशगमनाची संधी चालून येईल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. वरिष्ठ व सहकारी यांची साथ लाभदायक ठरेल. महिलांना वातावरण अनुकूल लाभल्याने तणाव कमी होल. कौटुंबिक प्रश्‍न धसास लागतील. वेळ आनंदात जाईल

धनू : “हाती घ्याल ते तडीस न्याल.’ व्यवसायात कामाचा झपाटा चांगला राहील. पैशाची स्थितीही सुधारेल. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. नोकरीत स्वतःचे काम संपवून इतरांनाही कामात मदत कराल. महत्त्वाचे निर्णय घ्यायचे झाल्यास वरिष्ठांचा सल्ला घ्या. महिलांनी कामात चपळता दाखवून उरक पाडावा. प्रियजनांच्या जीवनातील आनंदाचे क्षण एकत्रित साजरा करता येईल. सामूहिक कामात सहभाग राहील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

मकर : नशिबाची व ग्रहांची साथ लाभल्याने प्रगतीचा आलेख चढता राहील. व्यवसायात नवीन संधी चालून येतील. केलेल्या कष्टाचे चीज होईल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत कार्यतत्पर राहाल. बेकारांना कामधंदा मिळेल. मनाजोगता प्रवास होईल. नवीन ओळखी होतील. महिलांना गृहव्यवस्थापनाकडे लक्ष देता येईल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. तरुणांचे विवाह जमतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

कुंभ : पाण्यात राहून माशांशी वैर करता येत नाही, हे लक्षात ठेवा. व्यवसायात आपमतलब साध्य करण्यासाठी शत्रूलाही गोंजारावे लागते, हेही लक्षात ठेवा व त्याप्रमाणे वागा. कामाची आखणी योग्य करून त्याप्रमाणे कृती करा. पटले नाही तर शांत राहा. नोकरीत हटवादी राहून वैर पत्करू नका. पैशाच्या मोहमायी पाशापासून दूर राहा. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नका. घरात विचारपूर्वक निर्णय घ्या. स्वतःच्या मर्यादा ओळखा. खर्चावर बंधन ठेवा. तरुणांनी अतिविश्‍वास बाळगू नये.

मीन: व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवा. दुसऱ्यावर विसंबून न राहता कामे हातावेगळी करा. नोकरीत मिळालेल्या अधिकाराचा सदुपयोग करा. मनाविरुद्ध वागावे लागले तरी मतप्रदर्शन करू नका. महिलांना मुलांच्या तैनातीत राहावे लागेल. दगदग, धावपळ होईल. गृहसौख्य मिळेल. आप्तेष्ट व मित्रमंडळींच्या भेटीने आनंद वाटेल. प्रकृतीमान सुधारेल. विद्यार्थ्यांना स्पृहणीय यश संपादन करता येईल.

अनिता केळकर
( लेखिका- ज्योतिषतज्ञ्)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.