हिमांशू
ट्रम्पसाहेबांचं राहू द्या! राहू द्या म्हणजे, ते आले आणि त्यांनी जिंकलं हे तर आहेच; शिवाय कमीत कमी या वर्षाअखेरपर्यंत तरी ते जागतिक महासत्तेचे प्रमुख आहेत. पण त्यांचं भविष्य फारसं उज्ज्वल दिसत नाही, असं किमान ग्रह-तारे तरी सांगताहेत, असं समजतं. खुद्द ज्योतिषांनीच तसं सांगितलंय म्हणे! अमेरिकेत ट्रम्पसाहेबांना असं सांगणारं कुणी भेटणं कठीणच! पण शनी वक्री गेल्यामुळं त्यांना आगामी निवडणुकीत यश मिळणं अवघड आहे, असं त्यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इथल्या ज्योतिषांनी सांगितलंय बुवा! बातमीच प्रसिद्ध झालीय तशी. त्यांच्या कारकिर्दीतल्या घटनांचा ग्रह-ताऱ्यांच्या अंगानं धांडोळाही घेतलाय.
असो, त्यांचं जे काही व्हायचं असेल ते अमेरिकेत होईल; शिवाय तिथल्या निवडणुकीला अजून काही महिने अवकाश आहे. सबब “राहू द्या’ हे उद्गार ज्योतिषांना उद्देशून असणार हे स्पष्ट आहे आणि त्यांचं लक्ष महाराष्ट्रदेशी वेधणं हा त्यामागील हेतू असणार हेही उघड आहे. कुणी “तीन पायांची शर्यत’ म्हणो अथवा कुणी “सर्वसामान्यांची तीन चाकांची रिक्षा’ म्हणो, ते आपल्या राज्यातलं सरकार आहे आणि ते स्थिर आहे की नाही, याबाबत नेतेमंडळी रोज उलटसुलट भाष्य करतात. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी सरकारनं जाहीर केली आणि त्याबरोबरच अशा वक्तव्यांना, घडामोडींना आणखी वेग आला. भाजपने तर राज्यभरात सरकारविरोधी आंदोलनांना सुरुवात केलीय.
“आज जो हुए मशहूर, जो कभी काबिल न थे… और मंजिल मिली उनको, जो दौड में शामिल न थे’ असा जोरकस शेर मारून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाच्या शिडात हवा भरली. आपण सत्तेवर येऊ असं ज्यांना वाटलंही नव्हतं, अशा अनेकांना चक्क मंत्रिपदं मिळाली हे खरंही आहे; त्यामुळं फडणवीसांचा टोमणा ज्यांना लागायचा त्यांना लागला. (सत्ता मिळेल या अपेक्षेनं पक्ष बदलणारे आज दुःखी आहेत, हा भाग वेगळा!) प्रतिहेक्टर 25 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचं वचन सरकारने दिलं होतं त्याचं काय झालं, असा सवाल फडणवीसांनी केला. पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही लगेच “बाप-बेटे की सरकार’ म्हणून डिवचलं.
थोडक्यात, कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, असा एकंदरीत सूर दिसून आला. भाजप सरकारने कर्जमाफीची योजना जाहीर केली होती, तेव्हा नेमकी याच्या उलट परिस्थिती पाहायला मिळाली होती. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारे योजना जाहीर करतात आणि विरोधी पक्ष त्या फसव्या असल्याचं सांगून आंदोलनं करतात. महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाचंही असंच आहे. विरोधी पक्षांना काळजी वाटून त्यांनी रस्त्यावर उतरावं, अशा घटना प्रत्येक सरकारच्या काळात घडतातच.
या घडामोडींचा संबंध आम्ही ट्रम्पसाहेबांचं भविष्य सांगणाऱ्यांशी का जोडला, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. त्यांनी सरकारची कुंडली पाहावी, असं आमचं मुळीच सांगणं नाही. त्यांनी अशा शेतकऱ्यांची कुंडली पाहायला हवी, ज्यांना बॅंकेच्या नोटीस बोर्डावर लागलेल्या यादीत स्वतःचं नाव शोधताना आम्ही टीव्हीच्या पडद्यावर पाहिलं. काहीजण तर खूपच अगतिक दिसत होते. अनेकांचे केस पिकलेले होते. कितीतरी पावसाळे पाहिले असतील त्यांनी. निसर्ग झेलला असेल… सरकारांचा आणि विरोधी पक्षांचाही!