उभ्याआडव्या रेषा: वारली चित्रकला

अश्‍विनी घाडगे

वारली ही ठाणे जिल्ह्यातील एक स्थानिक आदिवासी जमात आहे. वारली चित्रकला ही या आदिवासी समाजाच्या आयुष्याचं एक अविभाज्य अंग आहे. या ठिकाणी सणासुदीला किंवा एखादं लग्न ठरलं की पंचक्रोशीतील पुरुष-स्त्री चित्रकार उत्स्फूर्त भावनेने जमा होतात. मोठ्या उत्साहानं सारी घरं रंगवून टाकतात. त्यांनी रंगवलेलं प्रत्येक चित्र हे ट्यान्कची परंपरा दाखवतं.

शेणा-मातीनं सारवलेल्या कुडाच्या भिंतीवर तांदळाच्या पेजेनं रंगवण्याचा त्यांचा आनंद अगदी पूर्वापारचा आहे. या चित्रांत त्यांच्या धार्मिक विधी, लग्नविधी, देवदेवता, दैनंदिन जीवन, लोकजीवन व त्याबरोबर आजूबाजूचा परिसर, परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदीनाले, डोंगर, पहाड, वने, नाचनृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, परिसर, जत्रा इत्यादी विषयाला धरून भित्तीचित्रे रेखाटलेली दिसतात.

वारली चित्रकलेत कलाकार आकारांशी खेळत असतात. विविध आकारांपासून ही चित्रकला आपल्याला आकर्षित करत असते. त्यांच्या चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात. वारली चित्रकार ही झाडे रंगविताना नेहमीच मुळाकडून शेंड्यापर्यंत रंगवितो. अगदी सहजपणे त्यातून झाड व उगविण्याची भावना प्रकट होते. शहरी चित्रकार झाड काढताना त्याच्या नेमके उलट म्हणजे, वरून खाली रेषा काढतात. वारल्यांच्या मते खाली भूमीकडून वर उगवणारे झाड म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते.

वारली चित्र रेखाटणीचे विशेष म्हणजे चित्र काढताना सुरुवातीला चित्र किती मोठे काढावयाचे ते प्रथम निश्‍चित करून त्यानुसार बाहेरील नक्षीकाम व मधील चित्राभोवतालच्या आकृत्या व नक्षी क्रमाक्रमाने काढून घ्याव्या लागतात व शेवटी मधील चित्र काढले जाते. मनुष्य अगर प्राणी काढण्यासाठी सुरुवातीस दोन त्रिकोण काढून त्याला शरीर समजून हातपाय, डोके, शेपूट हे अवयव जोडतात. तसेच पाने, फुले, वलयदार, उभ्या आडव्या रेषांनी नक्षी काढून चित्रे काढली जातात.

शेकडो वर्षे जुनी असलेली ही एका आदिवासी पाड्यातील कला आज जगमान्य झाली आहे. इतकेच नव्हे तर ही चित्रकला केलेली वस्त्रे तरुणपिढीत फॅशन म्हणून पसंत केली जातेय. तसेच ही चित्रे असलेल्या बॅग्ज, मोठमोठ्या कलाकृती यांनाही प्रचंड मागणी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.