सणासुदीच्या दिवसांमुळे आशा

२० सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या घोषणांचा परिणाम मागील आठवड्यात देखील अनुभवायला मिळाला. एका आठवड्यात सेन्सेक्स ८०८ अंशांनी वाढला तर निफ्टी ५० नं २३८ अंशांची तेजी नोंदवली. मागील आठवड्यात रुपया देखील साडे एकोणचाळीस पैसे सुधारला व ७०.५५ या पातळीवर बंद झाला. निफ्टी५० मधील कंपन्यांपैकी भारत पेट्रोलियमच्या शेअर्सनी सर्वाधिक म्हणजे १६% वाढ नोंदवली तर येसबँकेचे शेअर्स सर्वाधिक १२ टक्क्यांपेक्षा जास्त पडले.

कंपन्यांच्या सुधारीत निकालांची अपेक्षा धरून परकीय गुंतवणूकदार व परकीय गुंतवणूकदार संस्थांनी गेल्या आठवड्यात बाजारात २०३६.७३ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली तर स्थानिक गुंतवणूकदार संस्थांद्वारे ८००.२४ कोटी रुपयांची खरेदी केली गेली. एकूणच पुढील आठवड्यापासून सुरु होणारा कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांचा हंगाम व अमेरिकेतील राजकीय अस्थिरता या गोष्टी नक्कीच बाजारावर परिणाम करू शकतील. या आठवड्यात प्रसिद्ध होणारे वाहन कंपन्यांच्या विक्रीचे आकडे क्षेत्रातील कंपन्यांबद्दल चर्चेचा विषय ठरतील. येणारे सणासुदीचे दिवस हे, बँकिंग, वित्तीय, वाहन व एफएमसीजी कंपन्यांसाठी एक आशा निर्माण करतील अशी अपेक्षा सर्वचजण गृहीत धरत आहेत, पाहुयात प्रत्यक्षात काय घडतंय ते. तांत्रिकदृष्ट्या निफ्टी ५० साठी ११७०० ही पातळी वरील दिशेस अडथळा ठरू शकते तर खालील बाजूस ११३५० व १११५० या प्रमुख आधार पातळ्या म्हणून विचारात घेता येऊ शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.