झेडपीवर आशा व गटप्रवर्तकांचा मोर्चा 

मानधन नको, वेतन हवे या घोषणांनी दणाणला परिसर

नगर  – गेल्या 9 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आशा, गटप्रवर्तकांच्या राज्यव्यापी आणि स्थानिक प्रश्‍न सोडविण्याच्या मागण्यांसाठी राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना व जिल्हा आशा संघटनेच्यावतीने बुधवारी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा नेण्यात आला. ठोस आश्‍वासन मिळत नाही, तो पर्यंत जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात सुमारे अडीच तास धरणे धरले. मानधन नको, वेतन हवे, या घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला होता.

संघटनेचे सचिव ऍड. कॉ. सुधीर टोकेकर, अध्यक्ष ऍड. कॉ. सुभाष लांडे, उपाध्यक्षा सुवर्णा शिंदे, कॉ.अंबादास दौंड यांच्या नेतृत्वाखाली बुरुडगाव रस्ता येथील भाकपच्या कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. हातात लाल झेंडे घेऊन आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी मंगल शिंगाणे, निर्मला खोडदे, जिल्हा संघटक कविता गिरे, रोहिणी कुलट, स्मिता ठोंबरे, स्वाती इंगळे, अर्चना आसने, रूपाली बनसोडे, रूपाली चौधरी, कोमल कासार उपस्थित होते. दुपारी उशीरा जिल्हा आरोग्याधिकारी डॉश संदीप सांगळे यांनी निवेदन स्वीकारून, स्थानिक प्रश्‍न तालुकानिहाय सोडविण्याचे व राज्यपातळीवरील प्रश्‍न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन सुटले.
गेल्या नऊ वर्षापासून आशा व गटप्रवर्तक विविध मागण्या तसेच पगार वाढीसाठी संघर्ष करीत आहे. या संघर्षातून आशांना 500 रुपयांवरुन 2 हजार रुपये मानधन मिळाले आहे. तर गट प्रवर्तकांना साडेआठ हजारच्या आसपास मानधन मिळत आहे. परंतु वाढती महागाई व कामाचे स्वरूप पाहता हे मानधन अत्यंत तोकडे आहे. वेतनवाढीसाठी राज्यातील विविध संघटनांच्या कृती समितीच्या वतीने दि. 4 जून रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर एक दिवसाचे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आरोग्यमंत्री विजय देशमुख यांनी शिष्टमंडळास दि.8 जून पर्यंत मानधन वाढीचा प्रस्ताव पाठवण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु हा प्रस्ताव चार अद्यापि पाठवला नसल्याने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. स्थानिक प्रश्‍न तातडीने न सोडविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
आशांना दरमहा 10 हजार रुपये तर गटप्रवर्तकां 15 हजार रुपये मानधन द्यावे, दरमहा 6 हजार रुपये पेन्शन सुरू करावी, सर्व आशा व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, गटप्रवर्तकांना प्रॉव्हिडंट फंड सुरू करावा, जे. एस. वाय. साठी आशांचे मानधन थकित ठेवू नये, दिवाळीनिमित्त जिल्हा परिषदेच्या खास राखीव निधीतून आशा व गटप्रवर्तकांना 2 हजार व 4 हजार रुपये दिवाळी भेट द्यावी आदी मागणी संघटनेने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.