नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) 28 अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर झाली. त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम यांना अटक करणाऱ्या रामास्वामी पार्थसारथी या अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
मागील वर्षी आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम यांना अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणात चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांनाही अटक झाली होती. त्या पिता-पुत्रांना अटक करणाऱ्या पार्थसारथी यांचा उल्लेखनीय सेवेबद्दल गौरव करण्यात आला आहे.
सीबीआयचे सहसंचालक धिरेंद्र शंकर शुक्ला यांनाही राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यांनी महत्वाच्या प्रकरणांत यशस्वी कामगिरी करून दाखवली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) रोशन अन्सारी या पहिल्या भारतीयाला ताब्यात मिळवण्यात देशाला यश आले.
ती कामगिरी करणाऱ्या पथकाचे नेतृत्व शुक्ला यांनी केले होते. महाराष्ट्रातील खैरलांजी हत्याकांडाचा तपास करणारे अधिकारी बिनय कुमार यांनाही सन्मानित करण्यात आले आहे. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित रेल्वेचे एक प्रकरण आणि निठारी हत्याकांडाचा तपास करणारे निर्भय कुमार यांनाही पदक जाहीर झाले आहे.