वाघोली – जीके फाउंडेशनच्या वतीने वाघोली ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. वाघोली (ता. हवेली) गाव हायटेक बनविण्यात कार्यकारी मंडळाचे मोलाचे योगदान असल्यामुळे सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले असल्याचे जीके फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष संदीप कटके यांनी सांगितले.
वाघोली गाव पुणे शहरालगत असून नुकताच वाघोली ग्रामपंचायतीचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्यात आला. जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात होती. वाघोलीसह 23 गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याची अधिसूचना बुधवारी (दि. 30 जून) रोजी जारी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिकेने ग्रामपंचायतचा ताबा घेतला. महापालिकेत गाव जाण्यापूर्वी वाघोली ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाने गावतील रस्ते, ड्रेनेज, पथदिवे, बाजार तळ शेड, भैरवनाथ तळे, वाघेश्वर उद्यान, कुंभार तळे, वाघेश्वर मंदिर परिसर, पाणीपुरवठा पुरवठा योजना, यासह विविध विकास कामे मार्गी लावून गाव हायटेक बनवून जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. वाघोली ग्रामपंचायत महापालिकेत गेली असली तरी वाघोली गाव हायटेक बनविण्यात कार्यकारी मंडळाचा मोलाचा वाटा असून जीके फाउंडेशनच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थित ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार, सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच संदीप सातव, उपसरपंच महेंद्र भाडळे यांना आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी जिल्हापरिषद रामदास दाभाडे, सुनील जाधवराव, युवराज सातव, सागर तांबे, मोरे, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
पुणे शहरालगत असणाऱ्या वाघोली ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाने विविध विकास कामे मार्गी लावून वाघोली गाव हायटेक बनवून पुणे जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे. – संदीप कटके (संस्थापक-अध्यक्ष, जीके फाउंडेशन)