रखडलेल्या मानधनाचा प्रश्न सोडवू ः मंत्री पाटीलांचे आश्वासन
विक्रम गोखले यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
पुणे – जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांना देण्यात येणारे मानधन अनेक दिवसांपासून मिळालेले नाही. त्यामुळे तत्काळ रखडलेले मानधन देण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांची संख्या पाहता त्यामध्ये वाढ करून 120 पर्यंत करावी, अशी मागणी ज्येष्ठ अभिनेते तसेच वृद्ध कलावंत मानधन योजनेचे अध्यक्ष विक्रम गोखले यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
त्यावर पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रखडलेल्या मानधनाचा प्रश्न त्वरित सोडवण्याचे आश्वासन दिल्याचे विक्रम गोखले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
यावर्षीही या योजनेंतर्गत 60 कलाकारांची निवड करण्यात आली. मात्र, मंत्रालयात वित्त विभागातून याला मंजुरी मिळाली नसल्याने अनेक कलाकारांचे मानधन हे गेल्या काही दिवसांपासून रखडलेले होते. तसेच पुणे जिल्ह्यात सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची संख्या मोठी आहे.
यामुळे पुणे जिल्ह्यासाठी या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 60 वरून 120 करण्यात यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. याला राज्यपातळीवरून मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी गोखले यांनी पाटील यांच्याकडे केली. त्यावेळी यावर्षी मानधन मिळण्यात काय अडचणी आल्या आहेत याची माहिती घेऊन वृद्ध कलाकारांना त्वरित मानधन देण्यात येईल. तसेच पुणे जिल्ह्यात या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.