नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात रामगिरी महाराजांच्या वक्तव्यामुळे उद्रेक झाला आहे. प्रशासन त्यांचे काम करत आहे. मात्र. काही राजकीय पक्ष स्वतःची पोळी भाजण्याचे काम करत आहेत, अशी टिका पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली. तसेच महाराजांच्या वक्तव्याचे राजकीय भांडवल न करता समाजात कोणीही अस्थिरता निर्माण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्री विखे यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन केले होते.
त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विनायक देशमुख, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी जिल्ह्यात ७ लाख १८ हजार अर्ज आले आहेत. ६ लाख ९२ हजार अर्ज मंजूर झाले आहेत.
ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिकिंग झालेले नसेल त्यांना पुढिल महिन्यात तीन महिन्यांचे एकदम पैसे दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना ही राज्य शासनाची महत्वाची योजना आहे.
राज्यात या योजनेचा शनिवारी (दि..१७) प्रारंभ होणार आहे. बालेवाडी (पुणे) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थित मुख्य उदघाटन सोहळा होणार आहे. त्याच बरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उदघाटन समारंभ होणार आहे. अहमदनगर शहरातील सहकार सभागृहात दुपारी एक वाजता जिल्हास्तरीय कार्यक्रम होणार आहे.
काही महिलांच्या खात्यात पैसे ऑनलाईन जमा झाले आहेत. काही ठिकाणी मोबाईल रेंज आणि तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा झाले नाहीत. काही अडचणी असल्या तरी पुढच्या महिन्यात तीन महिन्याचे पैसे जमा होतील.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यात दहा हजार तरूणांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पतसंस्था, साखर कारखाने, कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून दिला जाणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अंमलबजावणी लाभ सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थित दि. २२ रोजी शिर्डीला मेळावा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिर्डी एमआयडीसीची भूमिपूजन, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन तर उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
त्याच अकोले तहसील कार्यालयात उद्घाटन ऑनलाईन केले जाणार आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी संगमनेर किंवा राहुरी मतदार संघातून विधान सभेची निवडणूक लढविण्याचे वक्तव्य केले होते. खासदार राहिल्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. जो विचार केला तो चांगलाच आहे, अशी भूमिका स्पष्ट केली.
पूर्वीचे महसूल मंत्री शेतकरी विरोधी
खंडकरी शेतकऱ्यांना पूर्वी ५० टक्के नजराणा भरावा लागत होता. तो आता राज्य सरकारने पूर्णपणे माफ केला. अकारणी शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळण्यासाठी ७० वर्ष लढा सुरू होता. या जमिनी परत देता येणार नाहीत,
अशी भूमिका त्यावेळेच्या सरकराने न्यायालयात घेतली होती. संभाजीनगर खंडपीठाने या जमिनी मूळ शेतकऱ्यांना देण्याचा आदेश दिला आहे. पूर्वीचे महसूल मंत्री हे शेतकरी विरोधी होते, अशी टिका त्यांनी केली.