मधाचे फायदे (भाग 1)

आयुर्वेदात तीन महान औषधी उपयुक्‍ततेची, रोजच्या व्यवहारात सहज मिळणारी, सुलभपणे वापरता येणारी द्रव्ये सांगितली आहेत. मध हे समस्त कफविकारावर व काही प्रमाणात पित्त विकारावर उपयुक्‍त, तत्काळ गुण देणारे हुकमी प्राणिज द्रव्य आहे. मध चवीने गोड व तुरट, स्वभावाने अति रुक्ष, सूक्ष्म शरीरात कोणत्याही भागात खोलवर पोचणारा आहे.

मधाच्या अनेक गुणांपैकी जुळवून आणणे किंवा संधान करणे तसेच शोधन करणे उलटी थांबवणे व उलटी करवणे अशा परस्परविरोधी गुणांचा उपयोग रोग बरे करण्याकरिता होतो. मध बल देतो, तसेच फाजील चरबी कमी करतो. मध अग्निवर्धक व मलावष्टंभ करणारा आहे. मध गुणाने कोमल आहे. त्यामुळे शरीराची कांती सुधारण्याला मदत होते. मधामध्ये हृदयाला बल देणारे गुण आहेत. विशद गुणांच्या द्रव्यात मध अग्रभागी आहे.

आपल्या देशात मधाचा “परकॅपिटा’ किंवा माणसागणिक वापर नगण्य आहे. युरोप-अमेरिकेत मध शरीरात फाजील चरबी न वाढवता ताकद देणारे मधुर रसाचे टॉनिक म्हणून वापरतात. साखरेचे दुर्गुण मधात नाहीत, त्यामुळे स्थूल व्यक्‍तींकरिता मध उपयुक्‍त आहेच, त्याबरोबरच त्याने हृद्रोग, चरबीचे विकार, प्रमेह, जडपणा इत्यादी फाजील पोषणाचे विकार बरे होतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मधाच्या प्रत्येक कणात, बाहेरच्या आवरणात, महास्रोतसात रक्‍त – रक्‍तवाहिन्यात जिथे जिथे मध पोहोचेल तेथील बारीकसारीक कफाचा फाजील दोष मध शोषून घेतो. मध सूक्ष्म गुणांमुळे शरीरातील सर्व स्रोतसात सर्व वहन यंत्रणेत पोहोचतो. आपल्या या विलक्षण गुणाने शरीरात ठिकठिकाणी पडून असणाऱ्या मलद्रव्यांचे शोधन, क्षरण ही कार्ये मध करतो. मध हा केवळ एनर्जी देतो. फाजील वजन देत नाही. मात्र, याकरिता मध प्यावा लागतो. तो चमचा दोन चमचे घेऊन चालत नाही.

मध गरम पाण्याबरोबर घेण्याचा प्रघात आहे. त्यापेक्षा तो लिंबूरसाबरोबर घेणे अधिक चांगले. त्यामुळे उत्तम वातानुलोमन होते. मध हा वातवर्धक आहे. त्याचे विशिष्टगुरुत्व तेल, तूप, पाणी या तुलनेत दीडपट आहे. त्यामुळे त्याला शरीरात काम करायला लिंबूरसाची जोड फार उपकारक आहे.

मधाचे फायदे (भाग 2)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)