‘त्या’ पाच नगरसेवकांची घरवापसी

मुंबई: पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांची आज घरवापसी झाली आहे. या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा होती. अखेर आज त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.

नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, मात्र चारच दिवसात त्यांची सेनेत घरवापसी झाली.

राज्यात महविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्यापूर्वीच पारनेर नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने जवळीक साधत सत्ता स्थापन केली होती. मात्र राष्टवादी सोबतची ही मैत्री शिवसेनेला भोवल्याचं चित्र होत. या प्रकारानंतर शिवसेनेत तीव्र नाराजी उमटली. शिवसेना नेत्यांकडून आमचे नगरसेवक परत करा. असा निरोप देखील अजित पवारांना पाठवल्याची चर्चा होती.

या पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. या संपूर्ण प्रकरणात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी  मोलाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी नार्वेकर आणि नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

या पाच नगरसेवकांनी राजकारणात खळबळ उडवली होती. थेट अजित पवारांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याची चर्चा होती. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.