घर कामगारांची मुख्यमंत्र्यांना अडीच हजार पत्र

पिंपरी – करोना महामारीमुळे टाळेबंदीच्या काळात घरगुती काम करणाऱ्या कामगारांच्या कामावर मोठा परिणाम झाला आहे. या कालावधीत हजारो कामगार बेरोजगार झाल्याने दोनवेळ खायचे काय असा प्रश्‍न पडला असून जगायचे कसे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी अर्थसाह्य करावे, या मागणीसाठी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे व शहरातील घरकाम करणाऱ्या कामगारांकडून सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 2500 पत्रे आकुर्ड़ी व पिंपरी येथील टपाल पेटीत टाकून पाठवण्यात आली. पुढील एक आठवडाभर हा उपक्रम चालणार आहे.

टाळेबंदीमुळे शहरातील बहुतांशी महिला कामगारांना आपले उदरनिर्वाहाचे काम गमवावे लागले आहे. या काळात त्यांचे अतोनात हाल झाले आहेत. यामुळे दोन वेळ खायचे काय असा प्रश्‍न त्यांच्यापुढे पडला आहे. या प्रश्‍नाकडे राज्य सरकारने गांभिर्याने लक्ष देण्याची या घटकाची आग्रही मागणी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा महिला कामगारांना 15 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी.

तसेच या कामगारांना परत कामावर रुजु करुन घेण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी या पोस्टकार्डद्वारे करण्यात आली आहे. यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, राणी माने, कमल तोरणे, विजया पाटील, मनिषा पवार, कविता म्हस्के, बशीरा शेख, शकिला शेख, अशा दुनधव, अंजना कांबळे, जयश्री वाळुंज, सुवर्णा शेलार, रत्ना पाटील वंदना कारंडे आदीसह घरेलू कामगार उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.