घरांच्या विक्रीत झाली 13 टक्‍क्‍यांनी वाढ; सीबीआरईचा अहवाल

देशभरातील विकसकांमध्ये आशावाद परतला

नवी दिल्ली: सरलेल्या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च या काळात घरांच्या विक्रीत 13 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असल्याचे रिऍल्टी क्षेत्रातील माहिती संकलन करणारी कंपनी सीबीआरईने म्हटले आहे.
या तिमाहीत 30 हजार घरांची विक्री झाली आहे. ही आकडेवारी पुणे, हैदराबाद, बेंगलोर, कोलकत्ता, चेन्नई, मुंबई आणि दिल्ली या सात शहरासाठी आहे. या तिमाहीत घरांचा पुरवठाही वाढला आहे. मुंबई, चेन्नई, बंगळुरू आणि दिल्ली येथील घरांची विक्री अधिक वाढली असून त्या ठिकाणी नव्या योजनाही जास्त प्रमाणात जाहीर झालेल्या आहेत.

सरकारने किफायतशीर घरांना चालना दिलेली आहे. मंदी कमी झाल्याची चिन्हे दिसत आहेत. या कारणामुळे घरांची विक्री वाढली आहे. नोटा बंदीचा परिणाम समाप्त होऊन जीएसटी आणि रेरा काही राज्यात रुळू लागला असल्याची लक्षणे दिसत आहेत. काही राज्यातील नव्या योजनात 11 टक्के वाढ झाली आहे तर विक्रीत 19 टक्के वाढ झाली असल्याचे सीबीआरई इंडियाचे अध्यक्ष अंशुमन मॅगझीन यांनी सांगितले.

ते म्हणाले की, बऱ्याच शहरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे, जे लोक राहण्यासाठी घरे खरेदी करू इच्छितात त्यांच्याकडून घराची खरेदी होत आहे. गुंतवणूक म्हणून घरांची खरेदी आणखीही वाढलेली नाही. तयार असलेली घरे विकण्यावर विकासकांचा अधिक कल आहे. त्यामुळे नव्या योजना सुरू करण्याची विकसकांना फारशी घाई नाही. अर्थसंकल्पात घर निर्मितीसाठी केंद्र सरकार काही उपाय योजना करण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर या क्षेत्रात काही प्रमाणात तेजी येण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.