घरांच्या विक्रीतील घसरण सुरूच

व्याजदर कपातीमुळे आगामी काळात विक्री वाढणार

पुणे – एप्रिल महिन्यापासून अर्थमंत्रालय आणि जीएसटी परिषदेने रिअल इस्टेट क्षेत्राला बऱ्याच सवलती दिल्या आहेत. व्याजदरातही कपात झालेली आहे. मात्र, सप्टेंबरपर्यंत तरी याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून येत नाही. कारण जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत घरांची विक्री कमी झाली असल्याचे दिसून येत आहे.

अनारॉक या संस्थेने संकलित केलेल्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत पुणे शहरातील सदनिकांची विक्री 8 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 8,550 इतकी झाली आहे. देशातील 7 मोठ्या शहरातील विक्री 18 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 55,080 इतकी झाली आहे. म्हणजे इतर शहरांपेक्षा पुणे शहराची परिस्थिती बरी आहे. गेल्यावर्षी या तिमाहीत देशात 67,140 इतक्‍या घरांची विक्री झाली होती. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत झालेली विक्री एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत झालेल्या विक्रीपेक्षा 20 टक्‍क्‍यांनी कमी आहे.

बऱ्याच बॅंकांनी घरासाठीच्या कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. परिणामी सप्टेंबरपासून विक्री वाढण्याची शक्‍यता अहवालात सूचित केली आहे. या तिमाहीत सरकारने सबव्हेंशन योजनेवर मर्यादा आणल्या होत्या. त्याचबरोबर या तिमाहीत श्राद्ध पक्ष होता. याचाही घर विक्रीवर परिणाम झाला असण्याची शक्‍यता आहे. मात्र, दरम्यानच्या काळात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे आगामी काळाबाबत आशावाद व्यक्‍त करण्यात आलेला आहे.

देशातील इतर शहरांपेक्षा मुंबई, पुणेची परिस्थिती चांगली
केंद्र सरकारने कंपनी करात कपात केल्यानंतर शेअर बाजारांमध्ये जी तेजी आलेली आहे त्याचे प्रतिबिंब आगामी काळात सर्वच क्षेत्रांवर पडण्याची शक्‍यता आहे. या अहवालातील माहितीनुसार बंगळुरू शहरातील घरांची विक्री 35 टक्‍क्‍यांनी, हैद्राबाद शहरातील घरांची विक्री 32 टक्‍क्‍यांनी, कोलकत्ता शहरातील घरांची विक्री 27 टक्‍क्‍यांनी, राजधानी दिल्लीतील घरांची विक्री 13 टक्‍क्‍यांनी, चेन्नईतील घरांची विक्री 11 टक्‍क्‍यांनी तर मुंबई शहरातील घरांची विक्री 6 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. म्हणजे मुंबई आणि पुणे शहरातील परिस्थिती तुलनेने चांगली आहे. या अहवालानुसार या 7 शहरांत तयार असून विकल्या न गेलेल्या घरांची संख्या 6.56 लाख इतकी आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)