नगर, (प्रतिनिधी) – हातावर होम कोरंटाइनचा शिक्का असलेला एक वृद्ध व्यक्ती गुरुवारी दुपारी नगर शहरात फिरताना पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
ही व्यक्ती नगरमधील राहणारा असून तो कुठे प्रवास करून आला व कुणाच्या संपर्कात आला याची माहिती प्रशासन घेत आहे. साठ वर्षाचा वृद्ध त्याच्या मुलाच्या मोटारसायकलवरून शहरातील सर्जेपुरा परिसरातून जात होता. यावेळी पेट्रोलिंगला असलेल्या पोलिसांनी त्याला थांबवून विचारणा केली. तेव्हा त्याच्या हातावरती होम कोरंटाईन असा शिक्का होता. यावेळी पोलिसांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयाला माहिती सांगितली.
रुग्णालयाच्या पथकाने येऊन या व्यक्तीस घेऊन गेले. यावेळी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके त्या ठिकाणी उपस्थित होते. या व्यक्तीच्या हातावर होम कोरंनटाईन असा शिक्का असतानाही तो शहरात फिरून निष्काळजीपणा करीत असल्याने त्याच्यांवरती गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.